गेली अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांना नुकताच गंधार गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार सोहळा १४ नोव्हेंबरला ठाण्यात पार पडला. निवेदिता सराफ यांचे पती व ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.

“आज मी जे काही आहे ते माझे गुरु, माझे पती अशोक सराफ यांच्यामुळे आहे. आज त्यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला गेला याचा विशेष आनंद आहे” असं निवेदिता सराफ यावेळी म्हणाल्या. याशिवाय त्यांनी बिहार विधानसभेच्या निकालाबाबत देखील वक्तव्य केलं आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा, जनता दल (युनायटेड) आणि लोक जनशक्ती (रामविलास) पक्षाने जोरदार विजय मिळवला आहे. एनडीएने स्पष्ट बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे पुरस्कार स्वीकारल्यावर प्रतिक्रिया देताना मी कट्टर भाजपा समर्थक असून बिहारमधील भाजपाच्या विजयाचा आनंद झालाय असं निवेदिता सराफ यांनी म्हटलं आहे.

“मंचावर उपस्थित सगळे मान्यवर, आमदार संजय केळकर तुम्हा सर्वांचं बिहारबद्दल खूप खूप अभिनंदन! मी जरा कट्टर बीजेपी असल्याने मला फारच आनंद झालाय.” असं वक्तव्य निवेदिता सराफ यांनी केलं आहे.

निवेदिता सराफ पुढे म्हणाल्या, “माझ्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात ही बालनाट्यापासून झाली. सुधा करमरकर या माझ्या पहिल्या गुरु. त्यांच्या संस्थेतर्फे मी अनेक बालनाट्यांमध्ये काम केलं. यानंतर अमृतवेल आणि बंध रेशमाचे या खूप मोठ्या नाटकांमध्ये मी काम केलं. पण, मला रंगमंचावर उभं रहायला खऱ्या अर्थाने कोणी शिकवलं असेल तर त्या आहेत सुधा ताई. त्या काळात रत्नाकर मतकरी आणि सुधाताई सातत्याने बालनाट्य रंगमंचावर आणत होत्या. त्यांचे महाराष्ट्रभर दौरे असायचे. बालनाट्यामुळे उद्याचे प्रेक्षक घडतात. त्यामुळे बालनाट्यांची शिबिरं आयोजित करणं खूप महत्त्वाचं आहे. बालनाट्यांसाठी तुम्हाला जी काही मदत लागेल ती मी नक्की करेन, हा शब्द मी तुम्हाला देते. हा पुरस्कार मिळाल्यावर कुठे तरी माहेरचा पुरस्कार मिळालाय असं वाटतंय आणि सासरकडूनही हा पुरस्कार मिळाला कारण नवऱ्याकडून मिळाला. सासर आणि माहेर याचा यानिमित्ताने खूप सुंदर मिलाफ झाला. तुमचे खूप खूप आभार.”

दरम्यान, निवेदिता सराफ यांच्याप्रमाणे काही दिवसांपूर्वी अभिनेते- दिग्दर्शक महेश कोठारे यांनीही आपण मोदी आणि भाजपचे भक्त असल्याचं वक्तव्य केलं होतं. “भाजपा म्हणजे आपलं घर आहे, कारण मी स्वतः भाजपाचा भक्त आहे, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भक्त आहे” असं महेश कोठारे म्हणाले होते.