Nivedita Saraf & Aditi Paranjpe : महाराष्ट्रभूषण ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी दिल्लीहून परतीचा प्रवास करत असताना निवेदिता यांची फ्लाइट कॅप्टन भाची अदिती परांजपेने अशोक सराफ यांच्यासाठी विमानात खास उद्घोषणा करून त्यांना अभिवादन केलं होतं. हा व्हिडीओ सर्वत्र तुफान व्हायरल झाला होता.
अदिती परांजपे ही निवेदिता यांची बहीण डॉ. मीनल परांजपे यांची मुलगी आहे. आज अदितीच्या वाढदिवसानिमित्त निवेदिता यांनी खास पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रत्येकाला मावशी ही आपल्या आईसारखीच जवळची वाटते. अगदी असंच सुंदर नातं निवेदिता व अदिती यांच्यात आहेत.
अदितीच्या वाढदिवसानिमित्त निवेदिता यांनी खास पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्या लिहितात, “माय डार्लिंग अदिती… मला तुझा खूप खूप अभिमान आहे. तू अगदी कमी वयात खूप काही मिळवलं आहेस. आम्हाला सर्वांना तुझ्यामुळे प्रेरणा मिळते आणि विशेषत: आजच्या पिढीला तुझ्याकडे पाहून खरी प्रेरणा मिळेल. तुला खूप खूप प्रेम”
याशिवाय मराठी कलाविश्वाची लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान ही सुद्धा अदिती परांजपेची खूप चांगली मैत्रीण आहे. तिने देखील खास व्हिडीओ शेअर करत अदितीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तेजश्री लिहिते, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माय डार्लिंग अदिती… लव्ह यू आणि मला तुझा कायमच अभिमान वाटत राहील.”
दरम्यान, अदिती परांजपेबद्दल सांगायचं झालं, तर अदितीने मुंबईच्या साठ्ये महाविद्यालयातून विज्ञान शाखेत बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर ‘इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन अॅण्ड एव्हिएशन सेफ्टी’मधून बी.एस्सी. एव्हिएशन कोर्स पूर्ण केला. अवकाशात गगनभरारी घेण्याचं स्वप्न लहानपणापासून उराशी बाळगणाऱ्या आणि ते पूर्णत्त्वास नेणाऱ्या फ्लाइट कॅप्टन अदिती परांजपे ही आज अनेक मुलींसाठी प्रेरणास्थान आहे.
याशिवाय निवेदिता सराफ यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर सध्या त्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहेत.