‘मुळशी पॅटर्न’, ‘धर्मवीर’ या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक म्हणून प्रवीण तरडेंना ओळखलं जातं. मराठीसह बॉलीवूडमध्ये त्यांनी स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. रंगभूमीपासून त्यांनी अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात केली. त्यामुळे दरवर्षी २७ मार्च रोजी साजऱ्या केल्या जाणाऱ्या जागतिक रंगभूमी दिनाबद्दल त्यांनी खास पोस्ट शेअर केली आहे.

जागतिक रंगभूमी दिन दरवर्षी २७ मार्चला साजरा केला जातो. १९६१ मध्ये ‘युनेस्को’च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने या दिवसाची सुरुवात केली होती. या खास दिनाचं औचित्य साधत प्रवीण तरडेंनी लंडनमधून एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये त्यांनी जगप्रसिद्ध लेखक व नाटककार विल्यम शेक्सपिअर यांच्या घराला भेट दिल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : ‘चला हवा येऊ द्या’ फेम निलेश साबळेने पहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा, बायकोसह शेअर केला सेल्फी

प्रवीण तरडे या व्हिडीओमध्ये म्हणतात, “हे विल्यम शेक्सपिअर यांचं घर, संपूर्ण घर पाहताना एक वेगळाच आनंद झाला. त्यांचं सगळं घर पाहून मी बाहेर आलो आणि एका गोष्टीवर माझी नजर गेली. अर्थात ती गोष्ट पाहून माझा आनंद द्विगुणित झाला. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावी अशी ही गोष्ट म्हणजे आपले रवींद्रनाथ टागोर यांचा ब्रांझ धातूतला पुतळा विल्यम शेक्सपिअरच्या घरात लावलेला आहे.”

“हा पुतळा पाहून आपले भारतीय लेखक, साहित्यकार, नाटककार किती मोठे होते याची प्रचिती आपल्याला येते. खरंच ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.” असं प्रवीण तरडेंनी या व्हिडीओद्वारे सांगितलं.

हेही वाचा : “नाच गं घुमा कशी मी नाचू…”, छोट्या मायराचा सुकन्या मोने अन् सुप्रिया पाठारेंसह जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, प्रवीण तरडे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर “मुळशीची शान”, “वाह सुंदर”, “खूपच भारी माहिती मिळाली” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. याशिवाय त्यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर लवकरच सध्या ते ‘धर्मवीर २’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळत आहे.