Priya Bapat and Umesh Kamat Bin Lagnachi Goshta Trailer : मराठी इंडस्ट्रीतील क्युट कपल्सपैकी एक कपल म्हणजे अभिनेत्री प्रिया बापट आणि उमेश कामत. मराठी प्रेक्षकांची ही आवडती जोडी आहे. दोघे सोशल मीडियाच्या माध्यमातून कायमच चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. दोघांचं सध्या रंगभूमीवर जर तरची गोष्ट हे नाटक सुरू आहे. मात्र या दोघांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्याची चाहत्यांची इच्छा होती.

प्रिया-उमेश यांच्या अनेक चाहत्यांनी दोघांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि चाहत्यांची ही इच्छा अखेर पूर्ण होणार आहे. प्रिया-उमेश यांचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २०१३ साली दोघांचा ‘टाईम प्लीज’ नावाचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता, त्यानंतर आता जवळपास १२ वर्षांनी ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

‘बिन लग्नाची गोष्ट’ असं या सिनेमाचं नाव असून नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरमध्ये लग्न न करता एकत्र राहणाऱ्या जोडप्याची म्हणजेच प्रिया-उमेश यांची गोष्ट पाहायला मिळत आहे. लग्नाऐवजी लिव्ह-इन रिलेशनशिप राहणाऱ्या जोडप्याच्या भावविश्वाची छोटीशी झलक या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे.

प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्याबरोबरच मराठी इंडस्ट्रीमधील निवेदिता सराफ आणि गिरीश ओक यांच्याही चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. लग्नसंस्थेवर विश्वास असलेले निवेदिता सराफ आणि गिरीश ओक लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रिया-उमेश यांना नात्यामधील आपल्या माणसाच्या सहवासाचं महत्त्व समजावून सांगत असल्याचं या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे.

बिन लग्नाची गोष्ट चित्रपट ट्रेलर

या ट्रेलरमध्ये प्रिया गरोदर असून उमेश तिला या गरोदरपणात साथ देत आहे. त्याचवेळी उमेश दोघांना कधी तरी तिसऱ्या व्यक्तीची गरज लागणार असल्याचं म्हणतो. त्याचवेळी ट्रेलरमध्ये गिरीश ओक यांच्या तोंडी ‘या एकविसाव्या शतकात एकच रोग शिल्लक राहणार आहे, तो म्हणजे एकटेपणा’ हे वाक्य आहे. त्यामुळेच लग्न, लिव्ह इन रिलेशनशिपसह एकटेपणावरसुद्धा हा सिनेमा असल्याचं ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे.

प्रिया-उमेश यांच्यासह गिरीश ओक आणि निवेदिता सराफ यांच्या ट्रेलरमधील भूमिका आणि काही संवाद चांगलंच लक्ष वेधून घेत आहेत. ‘बिन लग्नाची गोष्ट’ सिनेमा गॉडगिफ्ट एंटरटेन्टमेंट प्रा. लि. आणि एस. एन. प्रॉडक्शन्स निर्मित, तेजश्री अडिगे आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन प्रस्तुत आहे. कथा समीर कुलकर्णी यांची असून, दिग्दर्शन आदित्य इंगळे यांचे आहे. येत्या १२ सप्टेंबर रोजी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.