‘बिन लग्नाची गोष्ट’ येत्या १२ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मराठी चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. या सिनेमात प्रिया बापट, उमेश कामत, निवेदिता सराफ आणि गिरीश ओक हे दमदार मराठी कलाकार झळकणार आहेत. खऱ्या आयुष्यातील जोडपं प्रिया व उमेश यांची जोडी १२ वर्षांनी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. प्रिया–उमेशची जोडी आधीपासूनच प्रेक्षकांची आवडती आहे. त्यांच्या सहजसुंदर केमिस्ट्रीमुळे दोघंही पडद्यावर रिअल वाटतात आणि हाच नैसर्गिकपणा दिग्दर्शक आदित्य इंगळे यांच्या नजरेत भरला.

आदित्य इंगळे त्यांच्या निवडीबद्दल म्हणाले, ”मी उमेश -प्रियाकडे एकदा जेवायला गेलो असताना, प्रियाची शिस्त, उमेशचा सहजपणा, गंमतीशीर स्वभाव बघून मला त्या दोघांपेक्षा त्यांच्यात माझी पात्रच दिसायला लागली. आशय आणि ऋतिका सारखेच ते वागत होते. ते इतके या पात्रांमध्ये फिट होत होते की त्यांच्याशिवाय दुसरा पर्याय असूच शकत नाही, असं मला वाटलं म्हणून मी त्यांना या चित्रपटासाठी विचारलं. त्यांना कथा ऐकवली. प्रिया तर गंमतीनं म्हणाली सुद्धा ‘तू आधी मला बघितलं आणि मग हे पात्र लिहिलं ना?!’ खरं तर या व्यक्तिरेखा आधीच लिहिल्या होत्या आणि हे दोघं त्यात परफेक्ट बसले. आशय -ऋतिका आणि उमेश – प्रियाच्या वागण्यात इतकं साम्य होतं की, दुसरं कोणी मला दिसलंच नाही.”

नात्यांच्या पारंपरिक चौकटींना धक्का देणारा आणि एक नव्या विचारांची झलक देणारा ‘बिन लग्नाची गोष्ट’ हा चित्रपट आहे. हा सिनेमा लिव्ह-इन रिलेशनशिपसारख्या आधुनिक संकल्पनेवर आधारित असून, नात्यांची नवीन व्याख्या मनोरंजनात्मकरित्या मांडतो. लिव्ह-इनमध्ये राहात असलेल्या या जोडप्याच्या आयुष्यात लग्नाआधीच गरोदरपणाचे वळण येते आणि त्यात एक अनपेक्षित ट्विस्ट या सिनेमात पाहायला मिळेल.

गिरीश ओक आणि निवेदिता सराफ ही लोकप्रिय जोडीदेखील चित्रपटात झळकणार आहे. या दोन जोड्यांच्या रंगतदार अभिनयामुळे ‘बिन लग्नाची गोष्ट’ प्रेक्षकांसाठी खास अनुभव ठरणार आहे. गॉडगिफ्ट एंटरटेनमेंट प्रा. लि. आणि एस. एन. प्रॉडक्शन्स निर्मित ‘बिन लग्नाची गोष्ट’ १२ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कथा समीर कुलकर्णी यांची असून, दिग्दर्शन आदित्य इंगळे यांनी केलं आहे.