Pushkar Jog on Nana Patekar And Rishi Kapoor: अभिनेता पुष्कर जोग हा नवनवीन चित्रपट आणि भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. त्याच्या वक्तव्यांची कायमच चर्चा होताना दिसते. मराठी चित्रपट का चालत नाहीत, यावरही तो अनेकदा बोलला आहे.
आता मात्र पुष्कर जोगने नाना पाटेकरांमुळे त्याला एका चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती, असे त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य केले आहे. त्याबरोबरच त्याच्या हिंदी चित्रपटातील त्याच्या भूमिकांबाबतही त्याने वक्तव्य केले आहे.
“जेव्हा मी गोविंदासरांचा अभिनय पाहिला, त्यावेळी…”
पुष्कर जोगने नुकतीच ‘मराठी मूड’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत पुष्कर जोगने दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. त्याबरोबरच त्याला अभिनयाची आवड कधी लागली, याबद्दलही त्याने सांगितले आहे. पुष्कर असेही म्हणाला की, सचिन पिळगांवकर माझे गुरू आहेत.
पुष्कर म्हणाला, “मी बालकलाकार म्हणून सिनेमात काम केले आहे. मला अभिनयाबाबत काहीही माहीत नव्हते. त्यानंतर सचिन पिळगांवकर यांच्याशी माझी भेट झाली. ते माझे गुरू आहेत. त्यांनी मला खूप काम दिलं. तीन वर्षं त्यांनी मला खूप कामं दिली. ‘आजमाइश’ या चित्रपटात मी धर्मेद्रसरांबरोबर काम केलं. ऐसी भी क्या जल्दी है’, ‘हम दोनों’ या चित्रपटात मी ऋषी कपूर, नाना पाटेकर यांच्याबरोबर काम केले आहे.”
“मी नशीबवान आहे की, मी ‘तू तू मैं मैं’ मध्ये काम केले आहे. मला अभिनयाची आवड कुठून लागली तर, मी जेव्हा गोविंदासरांचे चित्रपट पाहायचो, त्यांचे डान्स पाहायचो. मला वाटत नाही की, गोविंदासरांसारखा परफॉर्मर इंडस्ट्रीमध्ये आहे. जेव्हा मी गोविंदासरांचा अभिनय पाहिला, त्यावेळी वाटलं की, असं काहीतरी केलं पाहिजे. तिथून मला अभिनयात आवड निर्माण झाली.”
“त्यावेळी मी आईबरोबर मुंबईत यायचो”
“मी बालकलाकार म्हणून तीन-चार हिंदी चित्रपट केले आहेत. ‘हम दोनों’ या चित्रपटात काम करीत होतो, तेव्हाची आठवण आहे. मी लहान होतो, त्यावेळी मी आईबरोबर मुंबईत यायचो. आमच्याकडे गाडी नव्हती. त्यामुळे आम्ही टॅक्सीने यायचो. त्यावेळी आम्हाला कोणालाच बॉलीवूड माहीत नव्हतं. शफी इनामदार त्या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. मला ती फिल्म नानासरांनी दिली होती. त्यांनी शफीसरांना सांगितलं होतं की, पुण्याचा एक मुलगा आहे. तो ही भूमिका करेल. मी त्या भूमिकेसाठी ऑडिशन दिली नव्हती.”
“ऋषी कपूर यांना खूप राग आला…”
“सीन असा होता की, मी ऋषी कपूर यांच्या गॅरेजमध्ये काम करतो. त्यांनी नवीन गाडी घेतली आहे. ते आणि पूजा भट्ट त्या गाडीची पूजा करीत आहेत. आम्ही त्यांच्यावर फुले टाकत आहोत, असा तो सीक्वेन्स होता. त्यावेळी मला रिहर्सल किंवा सीन परत करायचा आहे वगैरे कळायचं नाही. फराह खान ते गाणं कोरिओग्राफ करत होत्या. त्यावेळी माइक नसायचा. तर सीन संपला किंवा परत करायचा असेल, तर ते शिट्टी वाजवत असत. तर फराह खान यांनी शिट्टी वाजवली. मला वाटलं की, तो फायनल सीन आहे आणि त्यामुळे माझ्या हातातील सगळी जी फुलं होती, ती मी ऋषी कपूर यांच्या डोक्यावर टाकली.”
पुष्कर जोग पुढे म्हणाला, “ऋषी कपूर यांना खूप राग आला. ते मला ओरडले. सेटवर ते खूप ओरडले. कोणालाही कशाला आणता, समजत नाही का, सराव चालू आहे, असं ते म्हणाले. मी सहा वर्षांचा होतो. मी रडायला सुरुवात केली. फराह खान यांनी मला खूप समजावलं. मी हे नानासरांना सांगितलं. ते दुसऱ्या दिवशी सेटवर आले. ते त्यांना खूप बोलले. लहान मुलांशी कसं बोलता? हा माझ्या मुलासारखा आहे, असं त्यांनी सुनावलेलं. त्यासाठी मी नानासरांचा आभारी आहे. ही चांगली आठवण नाही; पण मी त्यातून शिकलो.”
दरम्यान, पुष्कर जोग हा अभिनयाबरोबरच चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठीदेखील ओळखला जातो.