Marathi Actor Pushkar Jog Fitness : ‘जबरदस्त’ या सिनेमाचं नाव जरी घेतलं तरी डोळ्यासमोर पुष्कर जोगचा चेहरा उभा राहतो. मराठी मालिका, चित्रपट आणि ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्याच पर्वातून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणून त्याला ओळखलं जातं. पुष्कर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. अनेकदा सामाजिक विषयांवर तो आपली स्पष्ट मतं सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसमोर मांडतो. पुष्कर उत्तम अभिनेता आहेच पण, याच बरोबरीने तो निर्माता, दिग्दर्शक आणि जबरदस्त डान्सर म्हणून देखील ओळखला जातो.

पुष्करने नुकत्याच शेअर केलेल्या एका इन्स्टाग्राम पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अलीकडच्या काळात सेलिब्रिटी त्यांच्या फिटनेसच्या बाबतीत खूपच सतर्क असतात. यासाठी हे सेलिब्रिटी योग्य व्यायाम, आहार याकडे विशेष लक्ष देतात.

पुष्कर जोगने त्याच्या पोस्टमध्ये ६ किलो वजन घटवल्याचा खुलासा केला आहे. पुष्करला गेल्या काही दिवसांपासून High शुगर, High कोलेस्ट्रोलचा सामना करावा लागत होता. यामुळे गेल्या ८ महिन्यांत त्याने आपल्या फिटनेसवर पूर्ण लक्ष केंद्रीत केलं होतं.

पुष्कर म्हणतो, “८ महिन्यांपूर्वी मला ग्रेड ३ फॅटी लिव्हर, High शुगर आणि High कोलेस्ट्रोलचा त्रास होता. आता लिव्हरचा त्रास कमी झाला असून, साखर आणि कोलेस्ट्रोल या दोन्ही गोष्टी नियंत्रणात आल्या आहेत. या काही महिन्यांमध्ये मी व्यायाम आणि डाएटकडे संपूर्ण लक्ष केंद्रीत केलं होतं. आता मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे याचा मला आनंद आहे. आता आणखी फिट होण्याचं ध्येय माझ्यासमोर आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी ६ किलो वजन घटवलं आहे.”

Marathi Actor Pushkar Jog Fitness
पुष्कर जोगची पोस्ट ( Marathi Actor Pushkar Jog Fitness )

दरम्यान, पुष्करने त्याच्या फिटनेसचं श्रेय त्याचा ट्रेनर पुनीतला दिलं आहे. अभिनेत्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर गेल्या वर्षभरात ‘मुसाफिरा’, ‘एआय धर्मा स्टोरी’, ‘हार्दिक शुभेच्छा’ असे पुष्करचे अनेक हटके सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. मराठी सिनेमा पाहायला प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने जावं आणि आपला सिनेमा आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचावा यासाठी तो नेहमीच प्रयत्नशील असतो.