Actress Renuka Shahane : ‘हाच सुनबाईचा भाऊ’ या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान रेणुका शहाणे यांना लक्ष्मीकांत बेर्डेंनी खूप मार्गदर्शन केलं होतं. कारण, अभिनेत्रीचा तो पहिलाच मराठी चित्रपट होता. नृत्यदिग्दर्शकाचा ओरडा मिळाल्यावर त्यांनीच रेणुका शहाणेंना धीर दिला होता. “लक्ष्मीकांतने कायम लहान बहिणीप्रमाणे माझी काळजी घेतली होती” अशा भावना रेणुका शहाणेंनी नुकत्याच एका मुलाखतीत व्यक्त केल्या. यावेळी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणीत रेणुका शहाणे प्रचंड भावुक झाल्या होत्या.
आता रेणुका शहाणे आणि लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा अभिनय बेर्डे यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘उत्तर’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यानिमित्ताने आरपारला दिलेल्या मुलाखतीत रेणुका शहाणेंनी लक्ष्मीकांत बेर्डेंनी अभिनयचं नाव ठेवल्यावर त्यांना काय सांगितलं होतं यादरम्यानचा जुना किस्सा चाहत्यांना सांगितला आहे.
रेणुका शहाणे म्हणतात, “अभिनयचा जन्म झाल्यावर मला लक्ष्या म्हणाला होता की, माझ्या मुलाचं नाव मी अभिनय ठेवलंय. मी त्याला म्हणाले, ‘अरे वाह! खूप छान…’ यावर तो म्हणालेला ‘अगं का विचार?’ माझं असं झालं अरे अभिनय हे नाव फारच छान आहे. हे ऐकून लक्ष्मीकांत मला म्हणाला होता, सगळे म्हणतील लक्ष्याचा अभिनय उत्तम आहे.”
अभिनेत्री पुढे म्हणाल्या, “कॉमेडी करणं फार कठीण आहे. लक्ष्याने प्रत्येक भूमिका अप्रतिम केली. ‘लक्ष्याचा अभिनय उत्तम आहे’… या विचाराने त्याने लेकाचं नाव अभिनय ठेवलं होतं आणि ते अगदी खरं आहे. अभिनय आज्जीबाई जोरात या नाटकात काम करत होता. त्या नाटकाची सुरुवातीची उद्घोषणा लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आवाजात आहे. जेव्हा नाटक पाहताना मी त्याचा आवाज ऐकला…तेव्हा माझ्या मनात आलं अरे ही काय जादू आहे यार, खरंच मला त्याचा आवाज ऐकून खूप भरून आलं होतं.”
“मला लक्ष्मीकांतने खूप सपोर्ट केला होता. त्यामुळे आता या ‘उत्तर’ सिनेमाच्या निमित्ताने अभिनयबरोबर काम करणं हे माझ्यासाठी खूप जास्त इमोशनल होतं. अभिनय इतका चांगला मुलगा आहे…मुळात तो अभिनेता म्हणून लक्ष्मीकांतपेक्षा खूप वेगळा आहे. लक्ष्मीकांतमध्ये एक वेगळंच टॅलेंट होतं, त्याची एक वेगळीच मॅजिक होती. अभिनयबद्दल सांगायचं झालं तर माणूस म्हणून तो खरंच खूपच चांगलाय…त्याची काम करण्याची पद्धतही वेगळी आहे. तो विचार करतो, ट्रायआऊट करतो…लक्ष्मीकांत आणि अभिनय या दोघांचीही काम करण्याची पद्धत फार वेगळी आहे आणि अभिनय सुद्धा खूपच टॅलेंटेड आहे.” असं रेणुका शहाणे यांनी सांगितलं.
