Renuka Shahane : अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी आजवर अनेक गाजलेल्या कलाकृतींमध्ये काम केलेलं आहे. पण त्यांच्या ‘हम आपके है कौन’ या चित्रपटाची जादू प्रेक्षकांच्या मनावर आजही कायम आहे. हा चित्रपट आताही प्रत्येक घराघरांत पाहिला जातो. हा सिनेमा त्याकाळी सुपरहिट ठरला होता. या सिनेमानंतर रेणुका शहाणेंची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली.
‘हम आपके है कौन’ या सिनेमात साकारलेल्या पूजाच्या भूमिकेसाठी त्यांना अनेक नामांकनं मिळाली होती. यानंतर रेणुका शहाणेंनी फिल्मफेअरला मुलाखत दिली होती. ही मुलाखत प्रसिद्ध अभिनेत्री शम्मी यांनी पाहिली आणि त्यानंतर अभिनेत्रीला काय सल्ला दिला जाणून घेऊयात…

रेणुका शहाणे ‘आरपार’ला दिलेल्या मुलाखतीत सांगतात, “हम आपके है कौन’ या चित्रपटानंतर मला फिल्मफेअरचं नॉमिनेशन मिळालं होतं. ते लोक माझी मुलाखत घेण्यासाठी माझ्या घरी आले होते. तेव्हा मी घरचा सलवार-सूट घातला होता. केस असेच बांधले होते, मेकअप वगैरे काहीच नाही. मी तसाच इंटरव्ह्यू दिला होता. शम्मी आंटीबरोबर मी खूप काम केलेलं आहे. त्या माझ्या आवडत्या अभिनेत्री होत्या आणि त्यांनाही मी खूप आवडायचे. त्यांनी माझा इंटरव्ह्यू पाहिला आणि माझा क्लासच घेतला. त्या म्हणाल्या, अगं हे काय? तू पब्लिक फिगर आहेस…तू अभिनेत्री आहेस. तू जरा नीट आवरून मुलाखत दिली पाहिजेस.”

अभिनेत्री पुढे म्हणाल्या, “त्यांच्या व्यतिरिक्त मला असा कोणी सल्ला दिला असेल तर ती म्हणजे आपली सोनाली कुलकर्णी. तू जेव्हा बाहेर जातेस तेव्हा व्यवस्थित साडी, केस, थोडासा मेकअप वगैरे करत जा…असा सल्ला तिने मला आपुलकीने दिला होता. बरं तिचा सल्ला बरोबरच आहे. कारण, प्रेक्षकांना आपल्याकडून अपेक्षा असते. तेव्हा आपण अगदीच कशातरी गेलो, तर ते प्रेक्षक काय म्हणतील कशी दिसतेय ही? अर्थात या सगळ्याचं प्रेशर मी कधीच नाही घेतलं. पण, थोडं तरी आवरून बाहेर गेलं पाहिजे किंवा कॅमेऱ्यासमोर आलं पाहिजे. याची मला जाणीव झाली. त्यानंतर मी जरा कधी तयार झाले की मी शम्मी आंटीला फोटो पाठवायचे.”

दरम्यान, रेणुका शहाणेंच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, लवकरच त्या ‘उत्तर’ या सिनेमात झळकणार आहेत. हा चित्रपट १२ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होईल. यामध्ये रेणुका शहाणेंसह अभिनय बेर्डे, हृता दुर्गुळे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.