भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित ‘टीडीएम’ हा चित्रपट २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. राज्यात ज्या ज्या थिएटर्समध्ये चित्रपट प्रदर्शित झाला, तिथे त्याला चांगलं ओपनिंग मिळालं. पण, बऱ्याच ठिकाणी ‘टीडीएम’चे शो कॅन्सल केले गेले, तसेच चित्रपटाला प्राईम टाईम मिळत नसल्याचं दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे व टीमने याविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली. एका चित्रपटगृहात याबद्दल बोलताना यातील कलाकारांच्या डोळ्यात अश्रू तरळले. तो व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर ठीकठिकाणी या चित्रपटाची चर्चा व्हायला सुरुवात झाली. सोशल मीडियावर तर बऱ्याच लोकांनी या चित्रपटाला पाठिंबा दर्शवला. पण या सगळ्या गोष्टीमुळे भाऊराव कऱ्हाडे यांनीच हा चित्रपट चित्रपटगृहातून काढून घ्यायचा निर्णय घेतला. आता त्यानंतर ९ जूनला हा चित्रपट पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित करण्यात आला आहे. तरी अजून परिस्थिती जैसे थेच आहे. अद्याप चित्रपटाला प्राइम टाइम म्हणजेच संध्याकाळ आणि रात्रीचे शोज मिळालेले नाहीत. आणखी वाचा : प्रभासचा 'आदिपुरुष' मोडणार शाहरुख खानच्या 'पठाण'चे रेकॉर्ड; सिनेतज्ञांनी वर्तवला अंदाज नुकतंच कर्जत जामखेडचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी या चित्रपटाच्या समर्थनार्थ एक पोस्ट शेअर करत या चित्रपटाला प्राइम टाइम मिळावा अशी विनंती केली आहे. 'चित्रक्षा निर्मिती'ने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर रोहित पवार यांची ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ते म्हणतात, "मराठी कलाकार जिद्दी, कष्टाळू आहे, तो व्यवस्थेसमोर झुकत नाही, तो विनम्र होतो केवळ प्रेक्षकांसमोर. यावेळी 'TDM' या चित्रपटाला प्राइम टाइम शो देऊन चित्रपटगृहाच्या मालकांनी सहकार्य करायला हवं." याबरोबरच आपण सगळ्यांनी हा चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शो पाहून अशा मराठमोळ्या चित्रपटांना प्रोत्साहन द्यायला हवं असंही रोहित पवार या पोस्टमध्ये म्हणाले. या चित्रपटातून कालींदी निस्ताने आणि पृथ्वीराज थोरात हे दोन नवे चेहेरे लोकांसमोर येणार आहेत. याबरोबरच चित्रपटाचं कथानकही वेगळ्याच धाटणीचं आहे.