Rohit Raut and Juilee Joglekar : ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकर हे दोघंही घराघरांत लोकप्रिय झाले होते. शो संपल्यावरही या दोघांमध्ये चांगली मैत्री होती. या मैत्रीचं रुपांतर काही वर्षांनी प्रेमात झालं आणि २०२२ मध्ये रोहित-जुईलीने लग्नगाठ बांधली. या दोघांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. रोहित-जुईली त्यांच्या गाण्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. पण, त्यांनी नुकताच शेअर केलेला एक खास व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
रोहित आणि जुईली दरवर्षी गौरी-गणपतीचा सण साजरा करण्यासाठी त्यांच्या नागपूरच्या घरी जातात. जुईलीने घरच्या गौरी आगमनाचा सुंदर व्हिडीओ तिच्या इनस्टाग्रामवर शेअर केला आहे. गौरी पूजन, नैवेद्य, पूजा पार पडल्यावर भजनाचा कार्यक्रम याची झलक अभिनेत्रीच्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
जुईली लिहिते, “आमच्या नागपूरच्या घरी १००-१५० वर्षांहून अधिक परंपरा असलेला गोड सोहळा गौरी महालक्ष्मी आगमनाचा… प्रत्येक वर्षी न चुकता आम्ही हा सण उत्साहात साजरा करतो. यावर्षीचं गौरी पूजन अविस्मरणीय ठरलं! निहार आणि आमचे सगळे मित्रमंडळी आले होते. आम्हाला सर्वांना मिळून गौरी-गणपतीसमोर गानसेवा करण्याचं सौभाग्य लाभलं. परंपरेची ही नाळ अजूनही तितकीच जिवंत आहे, याचं समाधान शब्दांत मावणार नाही. याचा संपूर्ण व्हिडीओ तुम्हा सर्वांबरोबर शेअर करण्याची फार इच्छा होती. पण, खरंच तेवढा वेळ मिळाला नाही. त्यामुळे ही लहानशी झलक शेअर करतेय.”
जुईलीच्या पोस्टर त्यांच्या चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “फारच सुंदर”, “तुमच्या बाप्पाला आणि गौराईला आमचा नमस्कार”, “परंपरा जपणारे आपले मराठी कलाकार खूप सुंदर”, “रोहित-जुईली किती सुंदर आहे हा व्हिडीओ… तुमच्या गानसेवेची झलक पाहायला मिळाली असती तर बरं झालं असतं” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.
दरम्यान, रोहित राऊतच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर त्याने आजवर ‘नखरेवाली’, ‘मित्रा’, ‘नाच गो बया’, ‘मराठी ठेका’, ‘प्रेमाचा गुलकंद’ अशी एकापेक्षा एक जबरदस्त गाणी गायली आहेत. याशिवाय जुईलीची ‘कोकणपरी’, ‘सखे गं झाले मी साजणाची’ अशी अनेक गाणी चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत.