शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाची गेले अनेक महिने चर्चा होती. अखेर हा चित्रपट २८ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे तर अभिनेता अंकुश चौधरी याने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. तर याबरोबरच सना शिंदे व अश्विनी महांगडेही या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत.
या चित्रपटातील संवाद, या चित्रपटाचे दिग्दर्शन, गाणी, कलाकारांचा अभिनय हे सर्वच प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस पडले आहे. या चित्रपटाचे सर्वत्र भरभरून कौतुक होत असतानाच मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या संगीतकार-गायक सलील कुलकर्णी यांनी ‘महाराष्ट्र शाहीर’ ऐवजी ‘तेंडल्या’ या चित्रपटाचे कौतुक करणारी एक पोस्ट त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली. त्यावर एका नेटकऱ्याने त्याला “महाराष्ट्र शाहीर पाहिला नाही का?” अशी कमेंट करीत विचारले. त्यावर उत्तर म्हणून सलील यांनी केलेल्या सडेतोड कमेंटने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
आणखी वाचा : “लाइव्ह कॉन्सर्टमध्ये रेकॉर्डवर लिप सिंक करणे म्हणजे…”; सलील कुलकर्णी यांनी व्यक्त केली नाराजी
‘तेंडल्या’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सलील कुलकर्णी या चित्रपटाच्या प्रीमियर शोला उपस्थित होते. हा चित्रपट त्यांना खूप आवडला. या चित्रपटाचे कौतुक करणारी एक पोस्ट त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केली. ही पोस्ट शेअर करीत त्यांनी प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले. तर सलील यांनी या चित्रपटाचे केलेले कौतुक वाचून या पोस्टवर एका नेटकऱ्याने कमेंट करीत, “महाराष्ट्र शाहीर पाहिला नाही का?” असे त्यांना विचारले.

सलील यांनी देखील या कमेंटला पुणेरी शैलीत उत्तर दिलं. त्यांनी लिहिले, “आज पाहणार आहे. तुम्ही ‘एकदा काय झालं’ पाहिला का?” आता त्यांची ही कमेंट खूप चर्चेत आली आहे. तर यावर नेटकऱ्याने देखील उत्तर देत सलील कुलकर्णींच्या कामांचे कौतुक केले.