Santosh Juvekar Maharashtra State Marathi Film Award : झेंडा’, ‘मोरया’, ‘शाळा’, ‘बॉईज’ यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांतून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा अभिनेता म्हणजे संतोष जुवेकर. आजवर अनेक चित्रपटांतून नानाविध भूमिका साकारत त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. मराठी सिनेसृष्टीत आपली छाप उमटवल्यानंतर त्याने हिंदी चित्रपट क्षेत्रातही एन्ट्री केली. यावर्षीच्या विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटातही तो महत्त्वाच्या भूमिकेत होता.

मराठीसह हिंदीमध्ये काम करणाऱ्या संतोषला आजवर अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. अशातच यंदाचा ६१वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारही त्याला मिळाला. ‘रावरंभा’ या सिनेमातील जालिंदर या भूमिकेसाठी त्याला हा पुरस्कार मिळाला आहे आणि याबद्दल त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. तसंच एखाद्या कलाकारासाठी ही अभिमानाची गोष्ट असल्याच्या भावनाही व्यक्त केल्या.

संतोषने ट्रॉफीसह काढलेल्या फोटोंचा एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओसह तो असं म्हणतो, “ज्यासाठी केला अट्टाहास! या काळ्या बाहुल्या नशिबानं मिळतात; पण हे नशीब घडतं, ते आपल्या कामावर असलेल्या श्रद्धा आणि त्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे. तसंच त्या प्रयत्नांवरील नटेश्वराचा आशीर्वाद आणि मायबाप प्रेक्षकांची मिळालेली शाब्बासकीची पाठीवर थाप आणि नितांत प्रेम. बस्स… मग सगळंच शक्य झालंच समजा… लक्ष असूदे रे महाराजा…”

यासह त्याने दोन दिवसांपूर्वीच्या पोस्टमधूनही त्याचा आनंद व्यक्त केला होता. या पोस्टद्वारे संतोष म्हणालेला, “मंडळी एक आनंदाची बातमी… सगळ्यांच्या शुभेच्छा आणि बाप्पाच्या आशीर्वादाने मला यंदाचा ६१वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट हा मानाचा पुरस्कार सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून ‘रावरंभा’ या सिनेमातील जालिंदर भूमिकेसाठी मिळाला. सर्व प्रेक्षक मायबाप आणि परीक्षकांचे तसेच महाराष्ट्र राज्य मराठी रंगभूमी आणि चित्रपट सांस्कृतिक कार्यकारी विभागाचे आणि माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि माननीय सांस्कृतिक मंत्री महाराष्ट्र राज्य आणि माझ्या सिनेमाच्या सर्व टीमचे मनापासून आभार.”

दरम्यान, संतोषला मिळालेल्या या पुरस्कारानिमित्त सध्या चाहत्यांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. “खूप खूप अभिनंदन”, “खूप खूप अभिनंदन”, “दादा खूप प्रगती कर”, “तुझ्यापाठी गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे” या आणि अशा अनेक प्रतिक्रिया व्यक्त करत त्याचं कौतुक केलं आहे.