Manmohan Mahimkar regrets not getting Married: ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर ‘जत्रा’, ‘ही पोरगी कोणाची’ या चित्रपटांसाठी ओळखले जातात. याबरोबरच त्यांनी ‘छत्रपती ताराराणी’ अशा चित्रपटांतदेखील काम केले आहे. काही मालिकांमध्येदेखील त्यांनी यापूर्वी काम केले आहे.

आता मात्र मनमोहन माहिमकर यांनी गेल्या अनेक दिवसांपासून काम मिळत नसल्याने त्यांचे हाल होत आहेत, त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. भाऊ-वहिनी त्यांना त्यांची जागा विकण्यासाठी त्रास देत आहेत. तसेच पैसाच नाही तर कामाची भीक मागत असल्याचे त्यांनी म्हटले. ते असेही म्हणाले की, वय झाल्यामुळे माझी काळजी घेण्यासाठी कोणी तयार नाही. एकट्याला घर खायला उठतं, असे त्यांनी म्हटले आहे.

मनमोहन माहिमकर यांनी सांगितली आपबिती

मनमोहन माहिमकर यांनी नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत मनमोहन माहिमकर यांनी सध्या ते हलाखीच्या परिस्थितीत जगत असल्याचे म्हटले. याबरोबरच लग्न न केल्याचा पश्चात्ताप होत असल्याचे वक्तव्यही त्यांनी केले.

मनमोहन माहिमकर म्हणाले, “मी लग्न केलं नाही, याचं कारण म्हणजे आमचे दोन भाऊ वेगळे झाले होते. आम्ही दोन भाऊ बरोबर राहत होतो. दोन बायका एकत्र आल्या की भांडणं होतात आणि त्या काळात माझ्याकडे पैसेसुद्धा जास्त नव्हते. मी चित्रपटात काम करत होतो, मला तितके पैसे मिळायचे नाहीत. त्यावेळी मी विचार केला की लग्न केलं आणि पैसे नसतील मग मुलांचं पोट कसं भरेल, हा विचार करून मी लग्न केलं नाही. “

“आता मी एकटा राहिलो आहे. मला घर खायला उठतं. मला आता पश्चाताप होत आहे. जर मी लग्न केलं असतं तर मला चांगले दिवस आले असते. हे वाईट दिवस बघायला लागले नसते. ही मोठी चूक माझ्याकडून झाली. आता मी एकटा राहत आहे. मला एकट्याला घरचं सगळं काम करावं लागतं. आता मला कोणाचीच साथ नाही. मला फक्त देवाची साथ आहे. साईबाबा आणि स्वामींची साथ आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मनमोहन माहिमकर म्हणाले की, राज्यपालांकडे इच्छामरणासाठी अर्ज केला आहे. पण, ते इच्छामरणही मला मिळू शकत नाही. मला आता कामही मिळू शकत नाही, असे वक्तव्य करत त्यांनी आपबिती सांगितली आहे.