मराठी मनोरंजनसृष्टीत उत्तम अभिनय आणि परखड विचार मांडणारे लोकप्रिय अभिनेते म्हणजे शरद पोंक्षे. आजवर आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक नाटक, मालिका व चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सोशल मीडियावरही शरद पोंक्षे बरेच सक्रीय असतात. सोशल मीडियाद्वारे ते त्यांचे राजकीय, सामाजिक मतं शेअर करत असतात. अशातच शरद पोंक्षेंनी त्यांच्याबद्दलचा जुना किस्सा शेअर केला आहे.
शरद पोंक्षे आधी भायंदरला राहत असत. तेव्हा ते तिथल्या मित्रांबरोबर एकांकिका, नाटक यांच्या तालमी करत असतं. असंच एकदा ते त्यांच्या काही मित्रांसह नाटकाच्या तालमीनंतर रस्त्यावर उभे असताना पोलिसांनी येऊन त्यांना हटकलं. त्यानंतर काही चूक नसतानाही पोलिसांनी त्यांना जेलमध्ये टाकलं. शरद पोंक्षे यांनी या प्रसंगाबद्दल ‘राजश्री मराठी’बरोबर साधलेल्या संवादात सांगितलं आहे.
या प्रसंगाबद्दल शरद पोंक्षे असं म्हणाले, “एकदा आम्ही पहाटे चार वाजता एकांकिकेची तालीम संपली आणि रस्त्यावर उभे होतो. तर तिकडे पोलिसांची गाडी आली आणि त्यांनी काहीही कारण नसताना आम्हाला हटकलं. तर आमच्यातला एक मुलगा त्यांना बोलला की, तिथे जे चोर वगैरे फिरतात. त्यांना तुम्ही काही करत नाही आणि आम्ही इथे रोज दिसतो, हॉलमध्ये रिहर्सल करतो. तर आम्हाला बोलत आहात. तर त्या पोलिसाला राग आला आणि त्याने आम्हा सगळ्यांच्या मुस्काटीत मारली आणि आतमध्ये टाकलं.”
यानंतर शरद पोंक्षेंनी सांगितलं, “तेव्हा मोबाईल वगैरे नव्हता, त्यामुळे आम्ही निदान आमच्या घरी तरी सांगा म्हणून सांगितलं. तरी त्यांनी ऐकलं नाही. तेव्हा बेड्या वगैरे घालून घेऊन जाणार आणि अब्रू जाणार असं वाटलं होतं. त्यावेळी पोलिस स्टेशनमध्येच जाताना एक गणपतीचं मंदीर होतं. जाता जाता मला बाप्पा दिसला आणि मी त्याला म्हटलं की, यातून सोडव. माझी बाप्पावर खुप श्रद्धा आहे.”
यानंतर त्यांनी सांगितलं, “दोन तास आम्हाला आतमध्ये बसवलं होतं. कानाखाली वगैरे मारलं होतं. आम्ही काहीच केलं नव्हतं, आमचा काय गुन्हाच नव्हता. माझा बाप्पाचा धावा सुरू झाला. तेव्हा काय माहीत, आमच्या शाळेचे एक शिक्षक त्यांच्याकडे भांडण झालं म्हणून मारामारी करणाऱ्या भावांना घेऊन पोलिस स्टेशनमध्ये पहाटे पाच वाजता आले. जणू काही बाप्पानेच त्यांना पाठवलेलं.”
यानंतर शरद पोंक्षे म्हणाले, “आम्हाला बघून ते पोलिसांना म्हणाले की, “हे माझे विद्यार्थी आहेत. यांनी काय केलं. ही चांगल्या घरातील मुलं आहेत.” त्यानंतर आम्ही सगळं शिक्षकांना सांगितलं. मग त्या शिक्षकांनी मोठ्या ऑफिसरकडे जाऊन असं काही करू नका असं सांगितलं. मान्य आहे एक मुलगा उलट बोलला मी त्याला तुमची माफी मागायला सांगतो.”
यानंतर “आम्हीसुद्धा रडत रडत त्यांची माफी मागितली. मग आम्हाला सोडलं. तेव्हा घरचे टेन्शनमध्ये होते. वडील कामावर जात असतानाच मी घरी आलो. तेव्हा मी त्यांना तुम्ही संध्याकाळी घरी आलात की सगळं सांगतो असं म्हटलं. पण तोपर्यंत त्यांना सगळं माहीत झालेलं होतं.” असं शरद पोंक्षे म्हणाले.