सध्या लग्नाचे मुहूर्त सुरू असून अनेक कलाकार मंडळीही विवाह बंधनात अडकताना दिसत आहेत. लग्न कसं करायचं? प्रेमात पडून की रीतसर कांदेपोह्यांचा कार्यक्रम करत आई-वडिलांच्या पसंतीने जोडीदार निवडून? हे द्वंद्व प्रत्येक पिढीतील तरुणाईच्या मनात सुरू असतं. कधीतरी मग प्रेमात पडून लग्न करणाऱ्यांची संख्या वाढते. पण प्रेमात पडावं असं कोणी सापडलंच नाही तर लग्नच करायचं नाही का? किंवा मुळात लग्न तर करायचं आहे पण कशासाठी? असे कित्येक प्रश्न तरुण पिढीच्या मनात असतात. याच पिढीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या श्रीदेवी आणि प्रसन्न या दोघांच्या ठरवून केलेल्या लग्नाची गोंधळलेली प्रेमकथा ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. प्रेमपट आणि सई ताम्हणकर – सिद्धार्थ चांदेकर या मुख्य जोडीसह सुलभा आर्य, सिद्धार्थ बोडके, रसिका सुनील, संजय मोने, वंदना सरदेसाई, समीर खांडेकर, आकांक्षा गाडे, रमाकांत डायमा, शुभांगी गोखले, राहुल पेठे, पल्लवी परांजपे या मराठीतील दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची पर्वणी हे या चित्रपटाचं वैशिष्टय. वास्तव जीवनात एकमेकांमध्ये घट्ट मैत्री असलेल्या सई आणि सिद्धार्थ यांनी मैत्रीचे बंध बाजूला ठेवून या चित्रपटात प्रियकर आणि प्रेयसीची भूमिका कशी साकारली इथपासून ते इतक्या नामवंत कलाकारांबरोबर काम करताना आलेले अनुभव अशा विविध गोष्टींवर सिद्धार्थ चांदेकर आणि सई ताम्हणकर यांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयाला भेट देऊन मनमोकळया गप्पा मारल्या. 

हल्ली विवाहेच्छुक मंडळी डेटिंग अ‍ॅप किंवा विवाह जुळवून देणारी संकेतस्थळं या माध्यमातून आधी आपापल्या आवडीनिवडीनुसार पसंतीस उतरणाऱ्या तरुण-तरुणीला भेटतात. आपलं जमू शकतं असं वाटू लागलं की मग त्यानंतर एकमेकांच्या परिवाराच्या भेटीगाठी घडवून आणल्या जातात. या ट्रेण्डबरोबरच अशा भेटीत खरोखरच काय होतं? एकमेकांची पसंती मिळाली की लग्नाचा निर्णय लगेच घेतला जातो का? अशा विविध गोष्टींवर प्रकाश टाकणारा विशाल मोढवे दिग्दर्शित आणि अदिती मोघे लिखित ‘श्रीदेवी प्रसन्न’ हा चित्रपट राज्यभरात प्रदर्शित झाला आहे. प्रेम, लग्न, त्यानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्या, संसार-मूल जन्माला घालायचं की नाही या विचारावरून होणारे वाद अशा कित्येक पैलूंवर या चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे.

In Nagpur a sister killed her brother after information about an immoral relationship
सख्खी बहीण पक्की वैरीण! प्रियकराला सुपारी देऊन भावाचा खून; अनैतिक संबंधाची कुणकुण लागल्याने…
mrunal thakur reveals she felt intimidated while working with Shahid Kapoor expert shares tips to overcome
मृणाल ठाकूरने सांगितले शाहिद कपूरबरोबर काम करताना दडपण येण्याचं कारण; वाक्यही न आठवण्याची स्थिती का आली?
Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral

हेही वाचा >>> Sridevi Prasanna Movie Review : लग्नाची गोष्ट!

फिल्मी श्रीदेवी..

अभिनेत्री सई ताम्हणकरने या चित्रपटात श्रीदेवी नामक तरुणीची भूमिका साकारली आहे. ‘काही चित्रपटातील पात्रं ही आपल्या आजूबाजूलाच असतात. माझं श्रीदेवीचं पात्र असंच आहे. ती चित्रपट विश्वात रमणारी, एकत्र परिवारात राहणारी, काहीशी फिल्मी वाटेल अशा कुटुंबातील आहे. त्यांच्या घरात प्रेमात पडून लग्न करण्याची परंपरा असल्याने तिनेही त्याचं पालन करावं असं तिच्या आजीला वाटतं. अखेर श्रीदेवी लग्न जुळवून देणाऱ्या संकेतस्थळाचा आधार घेत यावर मार्ग काढायचे ठरवते आणि तिची भेट प्रसन्नशी होते’ अशी थोडक्यात माहिती सईने दिली. आत्तापर्यंतच्या सलग चित्रपटांतून सईने काहीशा गुंतागुंतीच्या प्रेमपटांतून गंभीर व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. श्रीदेवी त्यांच्यापेक्षा वेगळी आहे हे मान्य करतानाच मी कधी पात्राचा सखोल अभ्यास करून, ठरवून त्यावर काम करूयात असं काही करत नाही, असं तिने सांगितलं. किंबहुना श्रीदेवीसारखी साधी-सरळ व्यक्तिरेखा पडद्यावर साकारणंच अनेकदा अवघड असतं, असंही तिने सांगितलं.

गोंधळलेला प्रसन्न..

सिद्धार्थ चांदेकरने साकारलेला प्रसन्न श्रीदेवीच्या तुलनेत अधिक गोंधळलेला आहे. ‘प्रसन्न हा त्याच्या आयुष्यात फार गोंधळलेला आहे. त्याला लग्न करायचं आहे, पण प्रेमात पडून लग्न करायचं की लग्नानंतर तिच्या प्रेमात पडायचं आहे इथपासून त्याच्या मनातील गोंधळाची मालिका सुरू होते. एक दिवस तो इतर मुलींपेक्षा वेगळी वाटेल अशा थोडयाशा फिल्मी वाटणाऱ्या पण साध्या-सरळ वागणाऱ्या, बोलणाऱ्या श्रीदेवीला भेटतो. त्यानंतर त्याच्या आयुष्यात काय घडतं हे फार रंजकपणे चित्रपटात मांडलं आहे’, अशी माहिती सिद्धार्थने दिली.

व्यावसायिक भाव जपला..

तुमच्या जवळच्या मित्र-मैत्रिणीबरोबर चित्रपटात काम करायला मिळणं यापेक्षा आनंदाची गोष्ट दुसरी नाही हे कबूल करतानाच या चित्रपटात प्रियकर-प्रेयसीची भूमिका करताना मैत्रीबरोबरच कलाकार म्हणून व्यावसायिकता जपण्याच्या दृष्टीने एक पाऊल आम्ही पुढे टाकलं आहे, अशी भावना सिद्धार्थने यावेळी व्यक्त केली. आमच्यात घट्ट मैत्री असल्याने सुरुवातीला काम करताना कॅमेऱ्यासमोर तेच प्रतिबिंबित व्हायचं. आमच्या दिग्दर्शकानेही आम्हाला याविषयी स्पष्ट कल्पना दिली. तेव्हा आपण प्रेमी युगुलाची भूमिका साकारतो आहोत, त्यामुळे आमच्यात प्रेमाची भावना प्रेक्षकांना दिसली पाहिजे हे लक्षात घेऊन आम्ही प्रत्येक दृश्य देत होतो. अगदी चुंबनदृश्य देतानाही आम्ही कोणताच विचार केला नाही आणि व्यावसायिक नटांप्रमाणे आम्ही ते दृश्य पूर्ण केलं. कलाकार म्हणून तुम्ही व्यावसायिकही असलंच पाहिजे. त्यादृष्टीने आम्ही निश्चितच पुढे गेलो आहोत याचा आनंद या चित्रपटाने दिला, असं सईने सांगितलं.

लेखकाचा विचार महत्त्वाचा

चित्रपटाच्या निमित्ताने लेखकांशी संवाद साधला जातो का? त्यांचा दृष्टिकोन जाणून घेतला जातो का? या प्रश्नाचं उत्तर देताना सई म्हणाली, ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटाची लेखिका अदिती मोघे संपूर्ण चित्रीकरणादरम्यान उपस्थित होती. असं फार कमी वेळा होतं की लेखक संपूर्ण चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सेटवर असतो. प्रत्येक कलाकारासाठी लेखकाचं मत हे महत्त्वाचं असतं. लेखकाने जे लिहिलं आहे तसं पात्र आम्ही साकारू शकतो का? हे विचारायला आणि त्यांचं मत जाणून घ्यायला कलाकारांना नेहमीच आवडतं. आपल्याकडे जगभरात लेखकांना जेवढा मान दिला पाहिजे तेवढा दिला जात नाही, याची खूप मोठी खंत वाटते, असं तिने सांगितलं.

कलाकारांना निर्धास्तपणे काम करू द्या

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत काय फरक जाणवतो? याबद्दल सांगताना सई म्हणाली, ‘हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत फक्त भाषेचा आणि चित्रपट प्रदर्शित कुठे कुठे होतो याचाच फरक आहे. हिंदी चित्रपट देशभर प्रदर्शित होतात आणि मराठी चित्रपट महाराष्ट्रात.. पण दोन्हीकडे काम करताना कलाकारांची ऊर्जा आणि मेहनत ही सारखीच असते. त्यात काहीच फरक पडत नाही. सध्या अनेक कलाकार ही भाषिक, प्रांतिक चौकट मोडून काम करत आहेत, तर त्या कलाकारांना निर्धास्तपणे काम करू द्या. हिंदीत संवाद म्हणताना मराठीपणा जाणवतो वगैरे अशी टीका आणि अमूक कलाकार तिकडेच काम करतो वगैरे.. असा भेदभाव करू नका, असा आग्रही मुद्दा सईने मांडला.

‘आधी मराठीत उत्तम काम होऊ दे’

हिंदी चित्रपटसृष्त्त काम कधी करणार? याबद्दल बोलताना मुळात मी ज्या चित्रपटसृष्टीत काम करायला सुरुवात केली आहे तिथले चित्रपट उत्तम चालणं गरजेचं आहे, अशी भावना सिद्धार्थने व्यक्त केली. मराठी चित्रपट छान चालले तर आपोआप हिंदी आणि इतर भाषिक चित्रपटकर्मीपर्यंत माझं नाव पोहोचेल. आणि त्यातून उत्तम संधी उपलब्ध होतील. मला काही मोठया चित्रपटांसाठी विचारण्यात आलं होतं, पण मी कोणती भूमिका करणार? कशी करणार? माझ्या भूमिकेची खोली किती? या अशा गोष्टी माझ्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत, असं सिद्धार्थने सांगितलं.