Siddharth Chandekar Mother Seema Started New Business : मराठी नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांतून अभिनेता सिद्धार्थ चांदेकर घराघरांत लोकप्रिय झाला. सिद्धार्थने आजवर अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. अभिनेता सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतो. त्याने नुकतीच शेअर केलेली एक पोस्ट सध्या सर्वत्र चर्चेत आली आहे. सिद्धार्थने ही पोस्ट खास आपल्या आईसाठी शेअर केली आहे.
सिद्धार्थच्या आई सीमा चांदेकर यांनी नवीन व्यवसाय सुरू केला आहे. त्यांनी पुण्यात फूड्सचा बिझनेस सुरू केला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सीमा चांदेकरांच्या नव्या दुकानात ग्राहकांना सगळ्या घरगुती गोष्टी मिळतील असं सिद्धार्थने त्याच्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे. त्यांच्या नव्या व्यवसायाचं नाव ‘सीमा फूड्स’ असं आहे.
अभिनेता सिद्धार्थ चांदेकर त्याच्या आईच्या नव्या व्यवसायाविषयी माहिती देताना लिहितो, “नवीन बिझनेस, नवीन इनिंग! Proud Of You आई… तुझा खूप अभिमान वाटतोय. पुण्यात आरण्येश्वर चौकात माझ्या आईचं हे नवं दुकान! सर्व घरगुती गोष्टी मिळतील. जरूर भेट द्या.”
सिद्धार्थ चांदेकरच्या या पोस्टवर मराठी कलाविश्वातील कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. मुक्ता बर्वे, स्पृहा जोशी, सायली संजीव, आशुतोष गोखले, क्षिती जोग, सुखदा खांडकेकर, रोहन गुजर, गौरी नलावडे अशा अनेक कलाकारांनी कमेंट्स करत सीमा चांदेकरांना या नव्या व्यवसायासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय नेटकऱ्यांनी देखील त्यांचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, सिद्धार्थ चांदेकर व त्याच्या आई सीमा यांनी ‘स्टार प्रवाह’च्या ‘जिवलगा’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. यावेळी या मायलेकाच्या ऑनस्क्रीन जोडीला प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळाली होती. सिद्धार्थ नेहमीच आपल्या आईला प्रत्येक गोष्टीत खंबीरपणे साथ देताना दिसतो. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्याचंही कौतुक केलं आहे. अभिनेत्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर काही दिवसांपूर्वीच तो हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटात झळकला होता.