अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय जोडी आहे. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर सिद्धार्थ व मितालीने २४ जानेवारी २०२१ रोजी लग्नगाठ बांधली. सिद्धार्थ आणि मिताली सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. निरनिराळे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करीत ते चाहत्यांना अपडेट देत असतात. नुकतेच सिद्धार्थ व मितालीच्या लग्नाला तीन वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त अभिनेत्याने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.

सिद्धार्थने लग्नातला त्याचा व मितालीचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने लिहिले, “तीन वर्ष. थ्री चिअर्स. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको. आज मी जिथे आहे, त्यात तुझा खूप मोठा वाटा आहे. तू पाठिशी खंबीरपणे उभी होतीस म्हणून मी आज इथपर्यंत आलो आहे.” सिद्धार्थची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट करत दोघांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

पुण्यातील ढेपे वाडा येथे सिद्धार्थ व मितालीचा लग्नसोहळा पार पडला. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. लग्नात मितालीने हिरव्या रंगाची नऊवारी नेसली होती, त्यावर साजेसे असे दागिने घातले होते. तर सिद्धार्थने जांभळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. पारंपरिक लूकमध्ये दोघेही सुंदर दिसत होते.

हेही वाचा- “मराठी इंडस्ट्रीचा विजय थलपती”, श्रेयस तळपदेच्या ‘त्या’ व्हिडीओवर चाहत्याची कमेंट; अभिनेता म्हणाला, “बापरे! मित्रा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिद्धार्थच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर २४ नोव्हेंबरला त्याचा ‘झिम्मा २’ चित्रपट प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली होती. तर काही दिवसांपूर्वी त्याचा ‘ओले आले’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर नाना पाटेकर व सायली संजीव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रेक्षकांकडून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. आता येत्या २ फेब्रुवारीला त्याचा ‘श्रीदेवी प्रसन्न’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर सई ताम्हणकरची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांना सिद्धार्थ व सईची ‘अरेंजवाली लव्हस्टोरी’ बघायला मिळणार आहे.