Prathamesh Parab Wife Kshitija Ghosalkar : अलीकडच्या काळात सगळेच कलाकार सोशल मीडियावर सक्रिय असतात. मनोरंजनसृष्टीत काम करणाऱ्या कलाकारांना इन्स्टाग्राम, फेसबूकच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहता येतं.
मात्र, अनेकदा या माध्यमाचा वापर करताना कलाकारांना वाईट अनुभव देखील येतात. ‘टाईमपास’ सिनेमातून घराघरांत लोकप्रिय झालेल्या प्रथमेश परबच्या पत्नीला नुकताच असाच काहीसा अनुभव आला आहे.
प्रथमेश परबची पत्नी क्षितीजा घोसाळकरच्या नावाने इन्स्टाग्रामवर बनावट अकाऊंट सुरू करण्यात आलं आहे. क्षितीजाने अनेकदा प्रयत्न करूनही हे अकाऊंट बंद झालेलं नाही. शेवटी तिने चाहत्यांना हे अकाऊंट मोठ्या संख्येने रिपोर्ट करा अशी विनंती केली आहे. अशा बनावट अकाऊंटमुळे चाहत्यांची फसवणूक होऊ शकते हा धोका लक्षात घेऊन प्रथमेशने स्वत: व्हिडीओ शेअर करत त्याच्या चाहत्यांना महत्त्वाची विनंती केली आहे.
प्रथमेश म्हणाला, “नमस्कार मित्रांनो! क्षितीजाचं फेक अकाऊंट बनवण्यात आलं आहे. हे अकाऊंट जवळपास ऑक्टोबर- नोव्हेंबरपासून सुरू आहे. क्षितीजाने त्यांना मेसेज करून हे अकाऊंट बंद करण्याचे अनेक प्रयत्न केले पण, त्यांनी असं काहीच केलं नाही. याउलट तिला त्या फेक अकाऊंटवरून ब्लॉक करण्यात आलं आहे. ते आधी फक्त पोस्ट शेअर करायचे पण, आता त्या अकाऊंटवरून अनेकांना मेसेज वगैरे जात आहेत. त्यामुळे तुम्ही थोडी काळजी घ्या…आणि सर्वात आधी या अकाऊंटला रिपोर्ट करा. क्षितीजाच्या मेन अकाऊंटचं आणि या फेक अकाऊंटचं नाव अलमोस्ट सेम आहे. त्यामुळे प्लीज जे फेक अकाऊंट आहे ते रिपोर्ट करा…त्यांचे फॉलोअर्स क्षितीजाच्या मूळ अकाऊंटपेक्षा खूप कमी आहेत. मी आयडी मेन्शन करतो प्लीज रिपोर्ट करा.”
दरम्यान, प्रथमेशप्रमाणे लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ‘कोकण हार्डेट गर्ल’ म्हणजेच अंकिता वालावलकरने सुद्धा प्रथमेशचा हा व्हिडीओ रिशेअर करत तिच्याही चाहत्यांना हे फेक अकाऊंट रिपोर्ट करा असं सांगितलं आहे. “हे खूप भयानक आहे त्यामुळे आम्ही नक्की मदत करू” अशी कमेंट अंकिताने प्रथमेशच्या पोस्टवर केली आहे. याशिवाय प्रथमेश-क्षितीजाच्या चाहत्यांनी सुद्धा हे अकाऊंट रिपोर्ट करण्यास सुरुवात केली आहे.