अभिनेते शरद पोंक्षे यांनी आजवर अनेक मालिका, नाटक, चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कर्करोगाचं निदान झालं होतं. परंतु, त्यांनी त्यावर मात करत पुन्हा दमदार कमबॅक केलं. तर आजही ते अभिनयक्षेत्रात सक्रिय असून नाटक, चित्रपटांच्या माध्यामतून प्रेक्षकांसमोर येत असतात. अशातच आता लवकरच त्यांची निर्मिती असलेला ‘बंजारा’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

‘बंजारा’ या सिनेमाचं दिग्दर्शन त्यांचा मुलगा स्नेह पोंक्षेने केलं आहे. या चित्रपटातून तो मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करीत आहे, तर त्याने दिग्दर्शन केलेला हा पहिलाच चित्रपट आहे. ‘बंजारा’ हा चित्रपट येत्या १६ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यानिमित्त सध्या स्नेह व शरद पोंक्षे या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. यानिमित्ताने ते अनेक मुलाखती देत आहेत. अशातच नुकतीच त्यांनी ‘राजश्री मराठी शोबझ’ला मुलाखत दिली.

‘राजश्री मराठी शोबझ’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पोंक्षे व स्नेह यांनी एकमेकांबद्दलचे काही किस्से सांगितले. यादरम्यान शरद पोंक्षे म्हणाले, “मी त्याला एक गोष्ट सांगितली होती की, या क्षेत्रात दोन बा पासून लांब राहायचं; एक बाई आणि एक बाटली. या दोन करिअरची वाट लावतात. बाईच्या नादाला लागलास की वाट लागते आणि बाटलीच्या नादाला लागलास की वाट लागते. प्रेम कर एखादीवर, पण मग ते निष्ठेने केलेलं प्रेम पाहिजे. दर दोन वर्षांनी प्रेम बदलत राहील असं काही करू नकोस, त्याला प्रेम म्हणत नाही.”

‘बंजारा’ हा सिनेमा जून महिन्यात प्रदर्शित होणार असून या चित्रपटामध्ये शरद पोंक्षे, भरत जाधव, सुनील बर्वे, संजय मोने यांसारखे ज्येष्ठ कलाकार पाहायला मिळणार आहेत, तर यांच्यासह स्नेह पोंक्षे, सक्षम कुलकर्णी आणि आदित्य धनराज हे युवा कालाकारही पाहायला मिळणार आहेत. ‘बंजारा’ हा सिनेमा एकूण प्रवासावर आधारित आहे. महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटाचं चित्रीकरण सिक्कीममध्ये झालं असून तिथे चित्रीत होणारा हा पहिलाच चित्रपट आहे.