Subodh Bhave 50th Birthday Celebration : मराठी मालिका, चित्रपट व नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा लोकप्रिय अभिनेता म्हणून सुबोध भावेला ओळखलं जातं. मराठीसह हिंदी कलाविश्वातही त्याने उल्लेखनीय काम केलेलं आहे. ‘संगीत मानापमान’, ‘आणि डॉ. काशीनाथ घाणेकर’, ‘वाळवी’, ‘कट्यार काळजात घुसली’ अशा एकापेक्षा एक दर्जेदार सिनेमांमध्ये सुबोधच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सुबोधने ८ नोव्हेंबरला त्याचा ५० वा वाढदिवस साजरा केला. अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण मराठी मनोरंजनसृष्टी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.
सुबोध भावेच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन अंधेरीतील हॉटेलमध्ये पार पडलं. या कार्यक्रमाला शर्मिला व राज ठाकरे तसेच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे देखील उपस्थित होत्या. ठाकरे बंधू सुबोध भावेला खास वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते. या पार्टीमधील Inside व्हिडीओ ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
जयवंत वाडकर यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ठाकरे बंधू, शर्मिला ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्यासह सचिन पिळगांवकर, अशोक सराफ, पुष्कर श्रोत्री, बेला शेंडे, मृणाल कुलकर्णी या दिग्गज कलाकारांची झलक पाहायला मिळत आहे. सुबोधची पत्नी, दोन्ही मुलं अशा संपूर्ण कुटुंबाची झलक यात पाहायला मिळतेय.
सुबोध भावे वाढदिवसाचा केक कापताना त्याचा जवळचा मित्र व अभिनेता पुष्कर श्रोत्रीने त्याच्यासाठी खास बर्थडे साँग गायलं. याशिवाय या पार्टीत एका बाजूला सुबोधने आजवर काम केलेल्या चित्रपटांच्या पोस्टरचं कोलाज तयार करून लावण्यात आलं होतं. मराठी मनोरंजनसृष्टीतील बहुतांश कलाकार या पार्टीला उपस्थित होते. याशिवाय सुबोधच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी खास बर्थडे पोस्ट देखील शेअर केल्या होत्या.
दरम्यान, सुबोधच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, सध्या तो ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत समर राजवाडे ही मुख्य भूमिका साकारत आहे. यामध्ये त्याच्यासह अभिनेत्री तेजश्री प्रधान प्रमुख भूमिकेत झळकत आहे.
