Suraj Chavan & Kedar Shinde : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण सध्या त्याच्या ‘झापुक झुपूक’ सिनेमामुळे चर्चेत आहे. हा मुख्य हिरो म्हणून सूरजचा पहिला चित्रपट आहे. त्यामुळे त्याच्या सगळ्या चाहत्यांच्या मनात ‘झापुक झुपूक’बद्दल एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली आहे.

या ‘झापुक झुपूक’ सिनेमाच्या निमित्ताने सूरज चव्हाण व ‘झापुक झुपूक’चे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ‘लोकसत्ता ऑनलाईनच्या डिजिटल अड्डा’ला उपस्थिती लावली होती. यावेळी या दोघांनी दिलखुलास गप्पा मारत सेटवरचे अनेक किस्से शेअर केले.

सूरज चव्हाणला लिहिता-वाचता येत नाही. त्यामुळे चित्रपटात त्याच्याकडून काम करून घेणं हा दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यासाठी खूप मोठा टास्क होता. त्यात सूरजने याआधी मुख्य हिरो म्हणून कधीही काम केलेलं नव्हतं. त्यामुळे साहजिकच या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अनेक भन्नाट किस्से घडले. याचा खुलासा सूरज आणि केदार शिंदे यांनी लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

सूरज केदार शिंदे यांच्याबद्दल सांगताना म्हणाला, “सर जेव्हा मला नाराज करायचे तेव्हा, मी नीट काम करायचो नाही. जेव्हा मी खूश असतो ना आनंदात…एकदम माझ्या पॅटर्नसारखा…तेव्हा मी भारी काम करतो. पण, माझं मन दुखावल्यावर मी गप्प बसतो. कॅमेऱ्यासमोर मी काही बोलतच नाही. सर मला सेटवर खूप ओरडलेत. त्यांचा राग इतका खतरनाक आहे की, सेटवरची सगळी माणसं गप्प बसायची. डोळ्यातून पाणी येईपर्यंत रडलोय. पण, त्यांनी माझ्या चांगल्यासाठी या गोष्टी केल्या आणि त्यांनी माझ्याकडून सगळं नीट करून घेतलं म्हणूनच, हा ‘झापुक झुपूक’ तुमच्यासाठी घेऊन आलोय.”

केदार शिंदे याबद्दल म्हणाले, “एकदा काय झालं, मी मॉनिटरकडे बघत होतो आणि हा माझ्या बाजूला बसला होता. शूटिंगमध्ये आधीच थोडीफार चिडचिड झाली होती. त्यानंतर हा येऊन माझ्या बाजूला बसला आणि माझ्याकडे बघत होता…मी त्याला विचारलं काय बघतो? तर, मला म्हणाला तुम्ही माझ्यावर एवढे चिडता ना? माझे फॅन्स बघून घेतील तुम्हाला…” हा किस्सा ऐकल्यावर एकच हशा पिकला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सूरज चव्हाणची मुख्य भूमिका असलेला ‘झापुक झुपूक’ सिनेमा येत्या २५ एप्रिलला सर्वांच्या भेटीला येत आहे. यामध्ये इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, दीपाली पानसरे, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी असे अनेक लोकप्रिय कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत.