आज संपूर्ण जगभरात ‘फादर्स डे’ साजरा करण्यात येत आहे. आपल्या मुलांनी उत्तम करिअर करावं, आयुष्यात खूप पुढे जावं अशी प्रत्येक वडिलांची इच्छा असते. आज ‘फादर्स डे’च्या निमित्ताने मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी आपल्या बाबांसाठी खास पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.

या सगळ्यात मराठी कलाविश्वातील सुपरस्टार अभिनेता स्वप्नील जोशीच्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कारण, अभिनेत्याने आज ‘फादर्स डे’ निमित्त त्याच्या ९ वर्षांच्या लेकीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेता सांगतो, “प्रत्येक मुलीसाठी तिचा बाबा हा सुपरहिरो असतो आणि त्या बाबासाठी आपली लेक ही सर्वस्व असते. आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे. लीना आणि माझी लेक मायरा हिला तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच एका म्युझिक व्हिडिओमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि ती सुद्धा कोणाच्या गाण्यात? खुद्द मराठी संगीतविश्वाचे ब्लॉकबस्टर म्युझिक दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांच्या गाण्यात! ‘एकविरा म्युझिक’ या त्यांच्या कंपनीने “सांग आई” हे गाणं नुकतंच रिलीज केलं आहे. यासाठी गिरीजाचे मनापासून आभार- जी एकविरा म्युझिकची सर्वेसर्वा आहे आणि अवधूतची अर्धांगिनी सुद्धा आहे. तिनेच आमच्या मायराला अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्याची पहिली संधी दिली.”

स्वप्नील पुढे म्हणाला, “सेटवरचा प्रत्येकजण…स्पॉट बॉयपासून ते प्रोडक्शन टीमपर्यंत सगळ्यांनी मायराला इतकं प्रेम दिलं…पूर्निमा डे या प्रतिभावान अभिनेत्रीसह मायराने पहिल्यांदाच काम केलं आणि तो अनुभवही तिच्यासाठी खूपच गोड ठरला. मायराला यानिमित्ताने पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर जाण्याची संधी मिळाली. हे तिचं आयुष्यातलं पहिलंच काम… आणि ते ही अवधूत दादांसारख्या दिग्गजाबरोबर यापेक्षा सुंदर सुरुवात काय असू शकते?”

“आज आम्ही सगळे एक कुटुंब म्हणून मनापासून अभारी आहोत. अवधूत, गिरीजा आणि संपूर्ण एकविरा म्युझिक टीमचे! हे गाणं आता तुमचं आहे… त्याला भरभरून प्रेम द्या. हे मायराचं सिनेसृष्टीतलं पदार्पण नाही तर हा फक्त एका ९ वर्षाच्या मुलीचा तिच्या आवडीतून केलेला प्रामाणिक प्रयत्न आहे. तिला भविष्यात काय व्हायचं हे ती ठरवेल… पण आता तिचं समाधान, तिचा आनंद हे आमच्यासाठी खूप मौल्यवान आहे.” असं स्वप्नीलने यावेळी सांगितलं. अभिनेत्याने शेअर केलेल्या या सुंदर पोस्टवर नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वप्नील जोशीने बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. आता लेकीला या खास गाण्यातून बघताना त्याला खूप आनंद होतोय. आता येत्या काळात या बापलेकीची जोडी ऑनस्क्रीन बघायला मिळणार का? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.