Swapnil Joshi Reaction On Marathi Hindi Language Controversy : राज्यभरात सध्या सर्वात चर्चेत असलेला विषय म्हणजे हिंदी सक्तीचा. गेल्या काही दिवसांपासून मराठी विरुद्ध हिंदी असा भाषावाद सुरू आहे. त्रिभाषा सूत्रानुसार, पहिलीपासून हिंदी हा विषय सक्तीचा असावा या निर्णयानंतर मराठी-हिंदी भाषेचा मुद्दा चर्चेत आला. मात्र या निर्णयाला राजकीय तसंच मनोरंजन क्षेत्रातूनही कडाडून विरोध झाला.
हिंदी सक्तीच्या निर्णयावर अनेक मराठी कलाकारांनी सुरुवातीपासूनच विरोध दर्शवला. इंडस्ट्रीतील अनेकांनी हिंदी सक्ती नको म्हणत मराठी भाषेची मागणी लावून धरली. सोशल मीडिया पोस्ट तसंच माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमधून त्यांनी त्यांच्या मराठी भाषेबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. अशातच आता मराठी अभिनेता स्वप्नील जोशीनेही मराठी-हिंदीच्या मुद्द्यावर आपलं मत व्यक्त केलं आहे.
याबद्दल टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत स्वप्नील म्हणाला, “एक मराठी कलाकार आणि अभिनेता म्हणून याबद्दल काय भावना व्यक्त कराल? यावेळी स्वप्नील जोशी म्हणाला, “मराठी कलाकार आणि मराठी अभिनेता यापलीकडे जाऊन मी एक मराठी माणूस आहे. महाराष्ट्रात राहतो. माझं वैयक्तिक मत आहे की, हिंदीची सक्ती असू नये. ज्यांना हिंदी शिकायचं आहे, त्यांनी जरूर शिकावं. पण हिंदी शिकलीच पाहिजे. या मताचा मी नाही.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक पेड़ माँ के नाम’ या संकल्पनेतून प्रेरणा घेत ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत धाराशिव जिल्ह्याने एकाच दिवशी १५ लाखांहून अधिक वृक्षलागवडीचा संकल्प केला. अशा या अभियनात स्वप्नील जोशीनेही उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्याने हिंदी-मराठी भाषावादावर आपलं मत व्यक्त केलं.
दरम्यान, राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातून याबाबत प्रतिक्रिया उमटल्या. अनेक जण हिंदी विरोधात एकवटले. मग वाढता विरोध लक्षात घेता सरकारने याबद्दलचे दोन्ही जीआर रद्द केले. राष्ट्रीय पातळीवरही याचे पडसाद उमटले. अनेक मराठी कलाकारांनी याबाबत ठाम भूमिका व्यक्त केल्या.