Swapnil Joshi First Divorce : मराठी अभिनेता स्वप्नील जोशीने आजवर त्याच्या अनेक कलाकृतींमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. मालिका, चित्रपट आणि सीरिज अशा तिन्ही माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रेम या संकल्पनेवरील त्याचे अनेक चित्रपट आले आणि या चित्रपटामधील त्याच्या भूमिकांनी प्रेक्षकांचं कायमच लक्ष वेधून घेतलं. ‘मितवा’, ‘तू ही रे’, ‘दुनियादारी’, ‘प्यारवाली लव्हस्टोरी’ या चित्रपटांमधून अभिनेत्याने प्रेम या भावनेवरील भूमिका साकारल्या. अशातच नुकत्याच एका मुलाखतीत स्वप्नीलने प्रेम, लग्न, नातं आणि घटस्फोट या विषयांवर भाष्य केलं.
स्वप्नीलने नुकतीच ‘देंट ऑड इंजिनियर’ या युट्यूब वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याच्या पहिल्या प्रेमाबद्दल भावना व्यक्त केल्या. तसंच याच मुलाखतीत स्वप्नीलने पहिल्या घटस्फोटाबद्दलही भाष्य केलं. पहिल्या प्रेमाबद्दल स्वप्नील म्हणाला की, “नववीमध्ये असताना मला एक मुलगी आवडत होती. पण तेव्हा काही घडलं. तेव्हा ती समज नव्हती की, मुलगी आवडते म्हणजे नेमकं काय? हे तेव्हा माहितीच नव्हतं. तिला आपलं पेन द्या आणि आपण थुकरट पेन वापरा, हेच प्रेम होतं. तेव्हा सोशल मीडियाही नव्हता. त्यामुळे ती समज नव्हतीच.”
यापुढे त्याने सांगितलं की, “मग कॉलेजमध्ये एक अफेअर होतं आणि ते बऱ्यापैकी सीरियस अफेअर होतं. अकरावी किंवा बारावीमध्ये असताना ते होतं. पण ते अफेअर काही कारणाने मोडलं. तेव्हा असं लक्षात आलं की, आमच्या नात्याला पुढे काही भविष्य नाही. त्यामुळे त्याचं पुढे काही घडलं नाही. त्याचं दु:खही झालेलं. त्यानंतर पुन्हा काही वर्षांनी एक अफेअर झालं. मग लग्न झालं आणि पहिल्या लग्नानंतर चार-पाच वर्षांनी घटस्फोट झाला. त्यानंतर मग दुसरं लग्न झालं आणि आता ती बायको आहे. दोन मुलं आहेत आणि सुखी संसार सुरू आहे.”
यानंतर स्वप्नीलला “घटस्फोट घेतला तेव्हा लोक काय म्हणतील हा विचार आला का?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्याने उत्तर देत असं म्हटलं की, “माझा घटस्फोट झाला तेव्हा सोशल मिडिया नव्हता आणि मी आवर्जून उल्लेख करेन की तेव्हा प्रिंट (मुद्रित माध्यम) आणि टेलीव्हिजन मीडिया होतं. पण तेव्हा प्रिंटमधील एकाही पत्रकाराने ती बातमी छापली नाही. मला अनेक पत्रकार मित्रांचे फोन आले की, आमच्याकडे तुझ्याविषयी ही बातमी आली आहे; पण आम्ही ती छापणार नाही. कारण ही मराठी पत्रकारितेची संस्कृती नाही. तेव्हा एकाही पत्रकाराने वर्तमानपत्रात माझ्या घटस्फोटाबद्दल एकही बातमी छापली नाही आणि हे मी अभिमानाने सांगत आहे.”
त्यानंतर तो म्हणाला की, “आता सोशल मीडिया आलं आहे; त्यामुळे ते खरं आहे की नाही हे सुद्धा कोणी बघत नाही. पुर्वी बरोबर आहे की नाही हे पहिलं बघितलं जायचं. पण आता सगळ्यात आधी कोण बातमी टाकत आहे हे महत्त्वाचं झालं आहे. दोन लोकांचा घटस्फोट होणं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. अनेकजण याबद्दलच्या सोशल मीडिया पोस्ट शेअर करतात की, हे आमची वैयक्तिक बाब आहे. एक जोडपं जेव्हा वेगळं होत असतं तेव्हा ते अनेक यातनेमधून जात असतं. त्यात चूक कोण बरोबर कोण हे आपण ठरवू शकत नाही. वेगळ्या होणाऱ्या दोन माणसांशिवाय तिसऱ्या माणसाला कधीच काही माहीत नसतं.”