Vaishnavi Hagawane Death Case Hemant Dhome Post : पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने अवघा महाराष्ट्र हादरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) गटाच्या पक्षाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हिने १६ मे, २०२५ रोजी आत्महत्या केली. याप्रकरणी हुंड्यासाठी छळ झाला असल्याचे आणि कौटुंबिक हिंसाचारामुळे तिने आत्महत्या केल्याचे आरोप आहेत. वैष्णवीने आत्महत्या केल्याचं सुरुवातीला बोललं जात होतं. मात्र ‘आमच्या मुलीने आत्महत्या केलेली नाही; तर तिचा खून करण्यात आला आहे’, असा गंभीर आरोप वैष्णवीच्या कुटुंबियांनी केला आहे.
वैष्णवीच्या लग्नाच्या वेळी ५१ तोळे सोने, एक फॉर्च्युनर कार आणि इतर महागड्या वस्तू दिल्या गेल्या होत्या. पण नंतरही वैष्णवीकडून पैशांची मागणी करण्यात आली. तिला घरातूनही बाहेर काढण्यात आलं होतं. सासरच्या लोकांचा हा छळ सहन न झाल्याने तिने आत्महत्या केली. वैष्णवीच्या मृत्यूमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे आणि याप्रकणी आता राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
अशातच आता या प्रकरणी मराठी अभिनेता व दिग्दर्शक हेमंत ढोमेने त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हेमंत ढोमेने एक्सवर ट्विट करत याबद्दल भाष्य केलं आहे. या ट्विटमध्ये हेमंतने असं म्हटलं, “वैष्णवी कस्पटे (मुळ नाव) आणि तेच वापरावं. ज्या आडनावाने तिचा बळी घेतला ते नकोच. या आपल्या बहिणीचा आजच्या काळात हुंडाबळी गेलाय. गेली अनेक वर्ष तिचा छळ झाला आहे.”
वैष्णवी कस्पटे (मुळ नाव) आणि तेच वापरावं! ज्या आडनावाने तिचा बळी घेतला ते नकोच!
— Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) May 22, 2025
या आपल्या बहिणीचा आजच्या काळात हुंडाबळी गेलाय! गेली अनेक वर्ष तिचा छळ झालांय…
चूक दोन्ही बाजूची आहे… सासरकडच्यांची आणि हुंडा देणाऱ्या आईबापाची सुद्धा!
लवकरात लवकर कठीण कारवाई झाली पाहिजे आणि…
यापुढे हेमंतने ट्विटमध्ये म्हटलं, “चूक दोन्ही बाजूची आहे. सासरकडच्यांची आणि हुंडा देणाऱ्या आईबापाची सुद्धा… लवकरात लवकर कठीण कारवाई झाली पाहिजे आणि यापुढे आपल्या महाराष्ट्रात तरी अशा घटना होऊ नयेत म्हणून आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे.” या ट्विटमध्ये हेमंतने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅगही केलं आहे. तसंच त्याच्या या ट्विटवर अनेक नेटकऱ्यांनीही त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
वैष्णवी हगवणेची आत्महत्यानंतर राजेंद्र हगवणे आणि त्यांचा दुसरा मुलगा सुशील हगवणे फरार झाले आहेत, तर वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. वैष्णवी आणि शशांक यांचा २८ एप्रिल २०२३ रोजी सूसगाव येथे प्रेमविवाह झाला होता. वैष्णवीने घरच्यांच्या विरुद्ध जाऊन हे लग्न केलं होतं.