Vidyadhar Joshi React On Groupism : बॉलीवूडमधील गटबाजी (ग्रुपिझम) बद्दल आपण अनेक चर्चा ऐकून आहोत. अलीकडे मराठी इंडस्ट्रीतही हे ग्रुपिझम होत असल्याचं पाहायला मिळतं. या गटबाजीबद्दल अनेकांनी त्यांची मतं व्यक्त केली आहेत. काहींनी गटबाजी असल्याचे उघडपणे सांगितलं आहे, तर काही याबद्दल अडून अडून बोलताना दिसतात. अशातच मराठी अभिनेते विद्याधर जोशी यांनीसुद्धा मराठीमधील गटबाजीबद्दल त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मराठी नाटक, मालिका तसेच चित्रपट अशा तिन्ही माध्यमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते म्हणजे विद्याधर जोशी. विनोदी, गंभीर तसेच नकारात्मक भूमिकांद्वारे त्यांनी मराठीसह हिंदी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे. याशिवाय त्यांनी अनेक रिअ‍ॅलिटी शोद्वारेही प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. विद्याधर जोशी अनेकदा त्यांची मत उघपडणे व्यक्त करताना दिसतात.

अशातच त्यांनी राजश्री मराठीशी साधलेल्या संवादात या इंडस्ट्रीतील गटबाजीबद्दल त्यांचं मत व्यक्त केलं. याबद्दल ते म्हणाले, “ग्रुपिझम आहे. पण मला वाटतं थोड्या फार प्रमाणात ते असणारच. म्हणजे आता मला एखाद्याबरोबर काम करताना सहजपणा आणि आपलेपणा वाटत असेल; तर पुढे काम करताना समोरचा माणूस एखाद्या भूमिकेसाठी आपला विचार करतो. त्यामुळे थोडाफार ग्रुपिझम होतो आणि होत राहणार.”

विद्याधर जोशी इन्स्टाग्राम पोस्ट

यानंतर ते म्हणतात, “पण मी याचा कधीच विचार केला नाही. एखादा मला त्याच्या ग्रुपमध्ये नाही घेत तर मी काय करू? मी त्याच्यावर रागावू शकत नाही. मी ज्या ग्रुपमध्ये आहे किंवा जिथे मी काम करत आहे, ते काम मी शंभर टक्के करत राहीन. कधीतरी समोरच्याची अडचण येईल, की एखादा माणूस कमी असेल आणि तेव्हा तो माझा विचार करू ही शकतो. त्यामुळे माझं आधीचं काम चांगलं असणं गरजेचं आहे.”

यानंतर त्यांनी सांगितलं, “ग्रुपमध्ये जाऊन किंवा एखाद्याबरोबर दारू पिऊन आणि टाइमपास करून मला काम मिळेल असं नाही किंवा कार्यक्रमांना आणि पार्ट्यांना जाऊन काम मिळतं, यावरही माझा विश्वास नाही. त्यामुळे आधीच्या कामावरुनच दुसऱ्याच्या ग्रुपमधला माणूस कामासाठी विचार करू शकतो. त्यामुळे ग्रुपिझम असलं तरी काय फरक पडत नाही. आपण आपलं काम करत राहायचं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आजारामुळे काही काळ रंगभूमीपासून दूर गेलेले विद्याधर जोशी आता पुन्हा एकदा नाटकाद्वारे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. पु.ल. देशपांडे यांच्या ‘सुंदर मी होणार’ नाटकाच्या नव्या सादरीकरणातून त्यांनी रंगभूमीवर पुनरागमन केलं आहे.