विजय कोंडके दिग्दर्शित ‘माहेरची साडी’ हा चित्रपट चांगलाच गाजला. १९९१मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला अभूतपर्व यश मिळालं. आता ‘माहेरची साडी’ चित्रपटाच्या अपूर्व यशानंतर निर्माता-दिग्दर्शक विजय कोंडकेंचा ३४ वर्षानंतर ‘लेक असावी तर अशी’ चित्रपट प्रेक्षकांच्या लवकरच भेटीस येत आहे.

आपण आपल्या आयुष्यात वेगवेगळी नाती जपतो. सुख दुःखाच्या प्रसंगी याच नात्याची साथ आपल्याला मिळत असते. नात्यांचे महत्त्व पटवून देणारा आणि लेकीची माया दाखवून देणारा ‘लेक असावी तर अशी’ हा मराठी चित्रपट २६ एप्रिलला आपल्या भेटीला येतोय. ‘ज्योती पिक्चर्स’ निर्मित व एव्हरेस्ट एंटरटेनमेन्टची प्रस्तुती असलेल्या ‘लेक असावी तर अशी या चित्रपटाच्या निर्मितीची व दिग्दर्शनाची धुरा विजय कोंडके यांनी सांभाळली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर अनावरण सोहळा नुकताच कलाकार, तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न झाला.

हेही वाचा – Video: ‘पिंकीचा विजय असो’ मालिकेने ७०० भागांचा टप्पा केला पूर्ण, महेश कोठारेंसह कलाकारांनी केलं ‘असं’ सेलिब्रेशन

‘लेक असावी तर अशी’ चित्रपटात नयना आपटे, सविता मालपेकर, शुभांगी गोखले, यतीन कार्येकर, अभिजीत चव्हाण, प्राजक्ता हनमघर, ओंकार भोजने, कमलेश सावंत, सुरेखा कुडची या लोकप्रिय कलाकारांच्या भूमिका आहेत. तसेच साथीला गार्गी दातार हा नवा चेहरा झळकणार आहे.

‘चित्रपटातील कुटुंबाच्या प्रेमाच्या नात्यांचा प्रवास आपल्याला बरंच काही शिकवून जाईल’, असा विश्वास दिग्दर्शक विजय कोंडके यांनी याप्रसंगी व्यक्त केला. ‘विजय कोंडके यांचा चित्रपट’ आणि ‘उत्तम टीम’यामुळे चित्रपट करायला लगेच होकार दिला, असं सांगताना हा कौटुंबिक चित्रपट प्रत्येकाच्या मनात नक्कीच घर करेल असा विश्वास अभिनेत्री नयना आपटे, सविता मालपेकर आणि अभिनेते कमलेश सावंत यांनी यावेळी व्यक्त केला. मध्यवर्ती भूमिका देतानाच विजय सरांनी दाखवलेला विश्वास माझ्यासाठी मोलाचा होता, असं अभिनेत्री गार्गी दातारने सांगितलं.

हेही वाचा – अमिताभ बच्चन यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार घोषित; ए.आर. रेहमान, अशोक सराफ, अतुल परचुरे यांना देखील विशेष पुरस्काराने गौरवणार

‘लेक असावी तर अशी’ चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद विजय कोंडके यांची आहे. छायांकन के अनिकेत तर संकलन सुबोध नारकर यांचे आहे. विजय कोंडके आणि मंगेश कांगणे यांच्या गीतांना संगीतकार मनोहर गोलांबरे यांनी संगीत दिले आहे. वैशाली सामंत, अवधूत गुप्ते, मंदार आपटे, देवश्री मनोहर, स्वरा बनसोडे यांचा स्वरसाज गीतांना लाभला आहे. नृत्यदिग्दर्शन सुजीत कुमार तर कलादिग्दर्शन सतीश बिडकर यांचे आहे. कार्यकारी निर्माते सिद्धेश्वर नंदागवळे आहेत. ‘लेक असावी तर अशी’ चित्रपट २६ एप्रिलला राज्यभरात प्रदर्शित होणार आहे.