Who is Ashok Sarafs favorite co star:: अशोक सराफ यांनी आजपर्यंत मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांबरोबर काम केले आहे. तसेच काही हिंदी चित्रपटांतही त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. मात्र, त्यांचे व दिवगंत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीचे मोठे कौतुक झाले.

“आम्ही दोघांनी मिळून जवळजवळ ५० चित्रपट एकत्र केले”

आता नुकत्याच ‘अमुक तमुक’ला दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ यांनी निळू फुले आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. तुमचा आवडता सहकलाकार कोणता, ज्यांच्याबरोबर काम करायला कायम मजा आली; देवाण-घेवाण करता आली. यावर अशोक सराफ म्हणाले, “तसं सचिनबरोबर झालं. नंतर लक्ष्याबरोबर झालं. मी जो मार्ग अवलंबला, त्याच मार्गाने लक्ष्मीकांत आला. त्याने माझं टायमिंग बरोबर पकडलं, त्यामुळे त्याच्याबरोबरचे सीन चांगलेच रंगायचे. आम्ही दोघांनी मिळून जवळजवळ ५० चित्रपट एकत्र केले.”

पुढे ते म्हणाले, “मला ज्यांच्याबरोबर काम करण्याची मजा यायची आणि स्क्रीनवरचा जो मी सगळ्यात जेंटलमन नट मी स्क्रीनवरचा पाहिला, ते म्हणजे निळू फुले. इतका ग्रेट माणूस होता. पुढची व्यक्ती काय करते याबद्दल त्यांना अजिबात देणंघेणं नव्हतं. त्यांचं काम ते करायचे. एखादी व्यक्ती अमुक एखादी गोष्ट करतो म्हणून करायची, असं त्यांनी कधीच केलं नाही.

पुढे निळू फुले व त्यांचा एक किस्सा सांगत अशोक सराफ म्हणाले की, एक सीन आमच्याकडे आला, त्यामध्ये काही लिहिलं नव्हतं. मग दिग्दर्शकाने ती जबाबदारी आमच्याकडे दिली. मी त्यांना सांगत होतो, त्याला ते होकार देत होते. त्यांचा उत्साह खूप होता. त्यांना सीनमध्ये काय करतील, हे जाणून घेण्यासाठी ते उत्सुक होते. मी लिहित होतो, म्हणून मी माझ्यासाठी अधिक लिहिलं जाईल, अशी असुरक्षितता त्यांच्यामध्ये नव्हती.

“त्या सीनचा सराव करताना मी एक डायलॉग विसरलो, तर त्यांनी मला आठवण करून दिली. त्यांच्यामध्ये अजिबात अहंकार नव्हता. कलेशी ते खूप प्रामाणिक होते. त्यांची जागा कोणीतरी घेऊ शकतं, याची त्यांना पर्वा नव्हती. सज्जन नट म्हणतात ना, तर ते तसे होते. मला त्यांच्याबरोबर काम करायला खूप मजा आली.

निळू फुले आणि अशोक सराफ यांनी ‘ठकास महाठक’, ‘फटाकडी’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘दीड शहाणे’ अशा अनेक चित्रपटांत एकत्र काम केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.