Zapuk Zupuk Movie Box Office Collection Day 5 : केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ सिनेमाची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. या सिनेमात ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणने प्रमुख भूमिका साकारली आहे. ‘बिग बॉस मराठी ५’च्या गेल्यावर्षी पार पडलेल्या महाअंतिम सोहळ्यात केदार शिंदेंनी सूरजवर सिनेमा बनवणार असल्याचं जाहीर केलं होतं. अखेर शो संपल्यावर अवघ्या सहा महिन्यांच्या आत ‘झापुक झुपूक’ हा सिनेमा सर्वत्र २५ एप्रिलला प्रदर्शित झाला.

‘झापुक झुपूक’ ( Zapuk Zupuk ) सिनेमासाठी सूरजने प्रचंड मेहनत घेतली असल्याचं केदार शिंदेंनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सूरजला ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागत आहे. यामुळेच सिनेमाचा टीझर आणि ट्रेलर आल्यावर चाहत्यांमध्ये जेवढी उत्सुकता होती त्याचं प्रमाण काहीसं कमी झालं आहे. सूरजच्या सिनेमाला हवा तसा प्रतिसाद मिळत नाहीये. सलग पाच दिवस सूरजच्या सिनेमाने काही लाखांतच कमाई केली आहे. ‘झापुक झुपूक’चं पाच दिवसांचं कलेक्शन जाणून घ्या…

सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ सिनेमाने पहिल्या व दुसऱ्या दिवशी २४ लाखांचा गल्ला जमावला होता. तिसऱ्या दिवशी या सिनेमाने १९ लाख तसेच चौथ्या दिवशी या सिनेमाने १४ लाखांची कमाई केली. तर, पाचव्या दिवशी ‘झापुक झुपूक’ने १७ लाख कमावल्याचं वृत्त इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने दिलं आहे. यामुळे, आता ‘झापुक झुपूक’ सिनेमाचं वर्ल्ड वाइड एकूण कलेक्शन १.०९ कोटी झालं आहे.

पाचव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी ( २९ एप्रिल ) या सिनेमावर निर्मात्यांनी खास ऑफर ठेवली होती. ‘झापुक झुपूक’ सिनेमा प्रेक्षकांना ९९ रुपयांमध्ये पाहायला मिळाला होता. आता येत्या काही दिवसांत सूरजचा सिनेमा किती कोटी कमावणार याकडे त्याच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘झापुक झुपूक’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं, तर २५ एप्रिलला प्रदर्शित झालेल्या या सिनेमात ‘गुलीगत किंग’ सूरज चव्हाण प्रमुख भूमिका साकारत आहे. यामध्ये त्याच्यासह जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी, दीपाली पानसरे या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. अनेक इन्फ्लुएन्सर्सनी सध्या सूरजच्या सिनेमाला पाठिंबा देत थिएटरमध्ये जाऊन ‘झापुक झुपूक’ पाहा अशी विनंती प्रेक्षकांना केली आहे.