सध्या मराठी चित्रपटसृष्टीत बहुसंख्य चित्रपटांची निर्मिती होत आहे. यंदा जानेवारी ते मे महिन्यात तब्बल पन्नासहून अधिक मराठी चित्रपट प्रदर्शित झाले असून एकाच दिवशी तीन ते चार मराठी चित्रपट प्रदर्शित होत असल्याने एकमेकांमध्ये स्पर्धा रंगलेली पाहायला मिळते आहे. परिणामी अनेक मराठी चित्रपटांना अपेक्षित आर्थिक यश साधता आलेले नसून चित्रपटगृहात तग धरून राहण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. आपापसातली स्पर्धा टाळण्यासाठी अनेक चित्रपट निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत दरवर्षी शंभरहून अधिक चित्रपटांची निर्मिती होते. या अनुषंगाने गेल्या काही महिन्यांत एकाच दिवशी चार ते पाच मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. परिणामी चांगले चित्रपट असूनही अनेक मराठी चित्रपटांना आर्थिक यश साधण्यासाठी तिकीट खिडकीवर तारेवरची कसरत करावी लागते आहे. या प्रतिकूल परिस्थितीत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याची भूमिका काही मराठी चित्रपट निर्मात्यांनी घेतली आहे. तसेच मराठी चित्रपटांची एकमेकांमधील स्पर्धा टाळण्यासाठी निर्मात्यांमध्ये समन्वय असणे आवश्यक असून चित्रपटाच्या प्रदर्शनासंदर्भात एक धोरण तयार झाले पाहिजे, यासाठी महाराष्ट्र शासनाने ठोस निर्णय घ्यायला हवा, असेही काही निर्मात्यांचे म्हणणे आहे.
भारत – पाकिस्तानमधील संघर्षामुळे निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळेही चित्रपटगृहांतील प्रेक्षकांची गर्दी कमी झाली होती. देशातील तणावपूर्ण परिस्थितीत चित्रपट प्रदर्शित करणे योग्य न वाटल्यानेही काही निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. देशप्रेम सर्वप्रथम असून सैन्यासोबत उभे राहण्याची आवश्यकता असल्याची भूमिका ‘आतली बातमी फुटली’, ‘अवकारीका’ या मराठी चित्रपटाच्या निर्मात्यांनी घेतली. ‘आतली बातमी फुटली’ चित्रपटाचे निर्माते विशाल गांधी म्हणाले, ‘आपण सर्वप्रथम भारतीय असल्यामुळे देश आणि सैन्याबरोबर उभे राहणे गरजेचे आहे. या परिस्थितीत चित्रपटाची प्रसिद्धी करणे चुकीचे ठरेल. तसेच आमचा ‘आतली बातमी फुटली’ हा एक उत्तम व्यावसायिक चित्रपट असल्यामुळे प्रसिद्धीवर व्यवस्थित लक्ष देणे अत्यंत आवश्यक असून त्यासाठी किमान २ महिने हवेत. खरंतर, शाळा व महाविद्यालयांना सुट्टी असल्यामुळे चित्रपट प्रदर्शनासाठी एप्रिल ते जून चांगला काळ असतो. ‘आतली बातमी फुटली’ हा चित्रपट ६ जून रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र आता हा चित्रपट जुलै किंवा ऑगस्टमध्ये प्रदर्शित करणार आहोत’. कोणत्याही चित्रपटाची निर्मिती झाल्यानंतर प्रसिद्धी मोहीम हा महत्त्वाचा टप्पा असतो. चित्रपटाच्या निर्मितीनंतर प्रसिद्धी मोहिमेसाठी पुरेसा वेळ मिळणे आवश्यक आहे, घाईगडबडीत केलेल्या प्रसिद्धीचा प्रभावी परिणाम पडणार नाही, हेच जाणून ‘अवकारीका’ चित्रपट १३ जूनऐवजी १ ऑगस्ट रोजी प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. ‘अवकारीका’ हा चित्रपट स्वच्छतेवर आधारित असल्याने हा चित्रपट सर्वांनी पाहावा अशी आमची इच्छा आहे. मी चित्रपटसृष्टीत नवीनच असून ‘अवकारीका’ हा माझा पहिला चित्रपट आहे. कोणतीही गोष्ट अपूर्ण राहता कामा नये. प्रसिद्धीची संपूर्ण प्रक्रिया १३ जूनपर्यंत पूर्ण होणे अशक्य होते, त्यामुळे ‘अवकारीका’ चित्रपट १ ऑगस्ट रोजी प्रदर्शित करण्याचे नियोजन केले आहे’, असे चित्रपटाचे निर्माते अरविंद भोसले यांनी सांगितले.
चित्रपट प्रदर्शनाचे धोरण आवश्यक
‘एकाच दिवशी बहुसंख्य चित्रपट प्रदर्शित होतात. तसेच गतआठवड्यात प्रदर्शित झालेले चित्रपटही असतात. चित्रपटगृहातही चित्रपडदे मर्यादित असल्यामुळे नवीन चित्रपटांना शो मिळणे अशक्य असते. त्यामुळे सदर परिस्थितीकडे सरकार आणि चित्रपट महामंडळाने गांभीर्याने लक्ष देण्याची, चित्रपट प्रदर्शनावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे, असे मत ‘शातिर’ चित्रपटाचे निर्माते सुनील वायकर यांनी व्यक्त केले. ‘शातिर’ चित्रपट २३ मे रोजी प्रदर्शित होणार होता, त्या दिवशी साधारण ७ मराठी चित्रपट आणि १ हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार होता. या गर्दीत चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळेल? हे सांगू शकत नसल्याने ‘शातिर’ चित्रपट १३ जून रोजी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. एकाच दिवशी अनेक चित्रपट प्रदर्शित होत असल्याने चित्रपट निर्मात्यांमध्ये महामंडळाने समन्वय साधणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सध्या बहुसंख्य चित्रपटांची निर्मिती होत असल्यामुळे निर्मात्यांवर प्रदर्शनाचे दडपण असते. ‘ओटीटी’ माध्यमावर बहुसंख्य कलाकृती पाहता येत असल्यामुळे चित्रपट कसा पाहावा, याची प्रेक्षकांना जाण आहे. तसेच एकाच दिवशी एकाच धाटणीचे चित्रपट प्रदर्शित होण्यापेक्षा भयपट, प्रेमपट, ऐतिहासिक, चरित्रपट आदी विविध विषयांवर आधारित चित्रपट प्रदर्शित झाल्यास प्रेक्षकांना चित्रपटांची वैविध्यपूर्ण मेजवानी मिळेल. संबंधित चित्रपटांना विशिष्ट प्रेक्षकवर्ग मिळून अपेक्षित आर्थिक यश साधता येईल. परिणामी चित्रपट निर्मात्यांमध्ये चांगला समन्वयही साधला जाईल, असे विशाल गांधी म्हणाले.
चित्रपट प्रदर्शन
जुनी तारीख नवीन तारीख
● एप्रिल मे ९९ १६ मे – २३ मे
● शातिर : २३ मे १३ जून
● सजना : २३ मे २७ जून
● अवकारीका : १३ जून १ ऑगस्ट
● आतली बातमी फुटली ६ जून – जुलै किंवा ऑगस्ट