त्र्यंबकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ गुरूपीठ गेल्या आठवडय़ात विविध उपक्रमांमुळे चांगलेच गजबजले. अण्णासाहेब मोरे यांचे हितगूज ऐकण्यासाठी एरवीही गुरूपीठात गर्दी होतच असते. परंतु मागील आठवडय़ात काही मुस्लिम भाविक आणि मौलानांनी उपस्थित राहून सर्वाचेच लक्ष वेधून घेतले. त्यातच ‘देऊळ बंद’ चित्रपटातील काही भागांचे चित्रीकरणही येथे झाले.
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातील प्रमुख सेवेकऱ्यांची बैठक, कृषी महोत्सव स्मरणिकेसह इतर पुस्तकांचे प्रकाशन, पीठापूर, कुरवपूर, गाणगापूर, ससोबावाडी येथील समर्थ केंद्राच्या निर्मितीचे नियोजनानिमित्त मोटय़ा प्रमाणावर मंडळी जमली होती. अकोल्याहून आलेले मौलाना इश्तियाक अहमद आणि इतर मुस्लीम भाविकांनीही चर्चेत सहभाग घेतला. स्वामी समर्थाचे कार्य आणि आजही स्वामी समर्थ सेवामार्ग केंद्रांच्या वतीने होत असलेल्या कार्याची माहिती पुढे यावी यासाठी ‘देऊळ बंद’ हा चित्रपट तयार करण्यात येत असून गुरूपौर्णिमेला तो सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे. चित्रीकरणाचा समारोप गुरूपीठात करण्यात आला. या चित्रीकरणात निवेदिता जोशी-सराफ, श्वेता शिंदे, गिरीजा जोशी, प्रविण तरडे, गंमीर महाजनी, विभावरी देशपांडे, कालकलाकार आर्या आदींनी सहभाग घेतला.
मौलाना इश्तियाक अहमद आणि मुस्लीम भाविकांच्या वतीने अण्णासाहेब मोरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितीतांशी संवाद साधताना इश्तियाक अहमद यांनी माणसा माणसात कुठलाही भेद नसल्याचे नमूद केले. सूर्य सर्वासाठीच तळपतो. पर्जन्य सर्वासाठी बरसतो. हवा सर्वासाठीच एक आहे. परमेश्वर असा भेद करत नसताना आपणच एकमेकांमध्ये भिंती का उभ्या करत आहोत. वाईट वागणारी व्यक्ती कोणत्याही धर्मातील असो, तिला माणूस म्हणवून घेण्याचा हक्कच नाही, असे नमूद करत त्यांनी स्वामी समर्थ सेवामार्गाच्या कार्याचा गौरव केला.
संग्रहित लेख, दिनांक 10th Apr 2015 रोजी प्रकाशित
स्वामी समर्थाच्या कार्यावरील ‘देऊळ बंद’चे गुरूपीठात चित्रीकरण
त्र्यंबकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ गुरूपीठ गेल्या आठवडय़ात विविध उपक्रमांमुळे चांगलेच गजबजले. अण्णासाहेब मोरे यांचे हितगूज ऐकण्यासाठी एरवीही गुरूपीठात गर्दी होतच असते.
First published on: 10-04-2015 at 12:14 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi movie deool band shooting in nashik