scorecardresearch

Loksatta Exclusive: आनंद दिघेंच्या भूमिकेत प्रसाद ओकला पाहताच उद्धव ठाकरे म्हणाले, “आता बाळासाहेब….”

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझी भूमिका पाहून भावूक झाले आणि त्यांना बाळासाहेबांची आठवण आली”, असे त्याने सांगितले.

ठाण्यात शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास लवकरच प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाचे अनेक पोस्टर, टीझर याची जोरदार चर्चा सुरु आहे. ‘धर्मवीर’ या चित्रपटाच्या निमित्ताने नुकतंच अभिनेता प्रसाद ओकने ‘लोकसत्ता डॉट कॉम’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल भाष्य केले. “उद्धवजी माझी भूमिका पाहून भावूक झाले आणि त्यांना बाळासाहेबांची आठवण आली”, असे त्याने सांगितले.

‘धर्मवीर’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना खासदार संजय राऊत हे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसाद ओकला धर्मवीर आनंद दिघेंच्या रुपात पाहताच फार बोलकी प्रतिक्रिया दिली. याचा खुलासा प्रसादने केला.

“डोक्यात जिहाद घेऊन जगणारा मुसलमान आपला शत्रू”, आनंद दिघेंच्या ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ बायोपिकचा ट्रेलर प्रदर्शित

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, “प्रसादजी तुम्ही फार सुंदर दिसत आहात. तुम्हाला बघून मला अगदी बाळासाहेबांची आठवण आली. बाळासाहेब आता या प्रसंगी असायला हवे होते आणि त्याचवेळी माझ्याही मनात तीच भावना होती.”

“या मंचावर एकनाथ शिंदे, संजय राऊत, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आहेत. पण आता या मंचावर मला अशा रुपात बघण्यासाठी बाळासाहेब असते तर काय झालं असतं… असा मी विचार करत होतो, तेवढ्यात उद्धव ठाकरेंनी मला तुम्ही फार सुंदर दिसताय असे सांगितले. त्यासोबतच आता बाळासाहेब असायला हवे होते”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

दरम्यान ‘धर्मवीर’ या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघेंची भूमिका साकारली आहे. ठाण्यामध्ये शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून आनंद दिघेंची ओळख होती. या चित्रपटाच्या माध्यमातून आनंद दिघे यांच्या व्यक्तीमत्वामधील एक सामान्य व्यक्ती, शिवसेना कार्यकर्ता ते ठाण्यातील शिवसेनेचा सर्वात प्रमुख नेता असा प्रवास उलगडणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केलं आहे. तर मंगेश देसाई यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या १३ मे रोजी ‘धर्मवीर मु. पो. ठाणे’ हा चित्रपट झी स्टुडिओजच्या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi movie dharmveer trailer launch cm uddhav thackeray reaction after saw prasad oak anand dighe look nrp

ताज्या बातम्या