dilip thakurगोष्ट जेवढी व जशी सोपी वाटते तितकीच ती प्रेक्षकाना विश्वास देत देत साकारणे काही वेळा आव्हानात्मक असते. ‘हमाल दे धमाल’च्या बाबतीत तेच तर दिसते. ५ ऑगस्ट १९८९ रोजी म्हणजेच बरोबर सत्तावीस वर्षापूर्वी आजच्या दिवशी तो प्रदर्शित झाला. एक श्रीमंत युवती ( वर्षा उसगावकर) एका हमालाला (लक्ष्मीकांत बेर्डे) प्रयत्नपूर्वक चित्रपट सुपर स्टार करते. या पैजेच्या प्रवासात तो नकळत तिच्या प्रेमात पडतो. तसेच तीदेखिल त्याच्या साधेपणावर आणि खरेपणावर भाळते… या गोष्टीचे मूळ ‘माय फेअर लेडी’ त! बासू चटर्जी दिग्दर्शित ‘मनपसंद’ चेही असेच कथासूत्र, परंतु तेथे कथेची पार्श्वभूमी अगदी वेगळी होती. त्याचे मराठी चित्रपटाचे रूपडे अस्सल मराठी संस्कृतीचे वाटावे यामध्ये पुरूषोत्तम बेर्डे कमालीचा यशस्वी ठरला. पण नाटकाकडून त्याचे हे चित्रपट माध्यमातील पाऊल सहज पडले नाही. हे दृश्य माध्यम व चित्रपट निर्मितीचे वातावरण जाणून घेण्यासाठी पुरूने दिग्दर्शक गिरीश घाणेकर यांजकडे ‘रंगत संगत’ च्या वेळी सहाय्यक राहणे पसंत केले. पूर्ण विश्वास आल्यावर त्याने ‘हमाल दे धमालची’ कथा पटकथा लिहून मग दिग्दर्शन केले. विवेक आपटे व निलेश पाटील यांच्याप्रमाणेच गीत लेखनही केले. संगीतकार अनिल मोहिलेंशी प्रत्येक गाण्यावर भरभरून चर्चा केली. आपल्यासाठी असलेल्या नवीन माध्यमात आपण जास्तीतजास्त गुण मिळवून उत्तीर्ण व्हावे यासाठी त्याचे हे प्रयत्न इतक्यावरच थांबले नाहीत. तर चित्रपटाच्या पूर्वप्रसिध्दीवर कमालीचे लक्ष ठेवून रसिकांसमोर या चित्रपटाचे आकर्षण वाटावे यानुसार काय व कसे जावे यासाठीच्या त्याच्या हुशारीला यश मिळाले. लक्ष्मीकांत बेर्डेला ‘हमाल…’च्या खणखणीत यशाने सुपर स्टार केले. वर्षा उसगावकरच्या गुणवत्ता व सौंदर्याला खूप चांगला वाव मिळाला. तीदेखिल सुपर स्टार झाली. इतर भूमिकांत निळू फुले , सुधीर जोशी , विजय पाटकर, जयवंत वाडकर , अशोक हांडे होतेच. पण पटकथेच्या गरजेनुसार अनिल कपूरही होता हे तर केवढे महत्वाचे व कौतुकाचे. एका गाण्यात रमेश भाटकर, महेश कोठारे, गिरीश घाणेकर , सतिश रणदिवे इत्यादी बरेचजण होते. गीत, संगीत, नृत्य या चित्रपटाची रंगत वाढवणारे. ‘बजरंगाची कमाल हमाल दे धमाल’ या गोविंदा गीताची आजही लोकप्रियता कायम आहे. ‘मन मोहना तू राजा स्वप्नातला’, ‘कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटासाठी’ अशी एकूण आठ गाणी चित्रपटात होती. चित्रपटात हमालांचे जीवन , मानसिकता, दृष्टीकोन याचे पटकथेच्या ओघात होणारे दर्शन उत्तम. मुलगी पाहण्याच्या एका दृश्यात ती गरीब युवती (सोनाली अधिकारी) ‘मळ्याच्या मळ्यामधे पाटाचे पाणी जाते…’ हे जुने गाणे गुणगुणते हे आवडले. मराठी चित्रपटाच्या वाटचालीत अनेक कारणांनी ‘हमाल दे धमाल’ खूप महत्वाचा चित्रपट ठरलाय.
दिलीप ठाकूर