|| गायत्री हसबनीस
गेली दहा वर्षे मराठी चित्रपट-मालिका विश्वात चॉकलेट बॉय म्हणून आपली लोकप्रियता कायम ठेवणारा अभिनेता म्हणजे शशांक केतकर. ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेच्या अभूतपूर्व यशानंतर शशांक चित्रपट, नाटक, मालिका तसेच वेबमालिका, जाहिराती या सर्वच स्तरांवर प्रेक्षकांचा लाडका अभिनेता राहिला आहे. अलीकडेच ‘झी मराठी’वरच्या ‘पाहिले न मी तुला’ या मालिकेतून शशांकने खलभूमिका साकारली होती. त्याने साकारलेल्या समरच्या व्यक्तिरेखेचे कौतुकही सगळीकडे झाले होते. ‘पाहिले न मी तुला’ तसेच ‘सोप्पं नसतं काही’ या वेबमालिकेनंतर शशांक ‘स्टार प्रवाह’वरील ‘मुरांबा’ या आंबडगोड प्रेमत्रिकोणी कथेतून प्रेक्षकांसमोर येतो आहे.




‘मुरांबा’ या मालिकेतून प्रेमाचे एक वेगळे त्रिकुट पाहायला मिळणार आहे. शशांकच्या प्रेमात पडणारी आणि शशांक जिच्या प्रेमात पडलाय ती.. या दोघींशी जुळवून घेता घेता शशांकला त्याची व्यक्तिरेखा रंगवायची आहे. त्यातून त्या दोघींची घट्ट मैत्री असल्यावर या तिघांचे नाते कसे असेल? या सर्वच प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना हळूहळू या मालिकेतून मिळणार आहेत. ‘‘मुरांबामध्ये मी पंचवीस वर्षांच्या अक्षयची भूमिका करतो आहे. त्याला एक छोटासा आजार आहे त्यामुळे त्याबाबतीत मला थोडा अभ्यास करावा लागला. तो स्वत:ची कशी काळजी घेईल? कशाचे पालन करेल? आणि मी हॉटेल व्यवसायाशी संबंधितच काहीतरी काम या मालिकेत करतोय जे माझ्या स्वत:च्या आवडीचे क्षेत्र आहे त्यामुळे या मालिकेतून मी प्रेक्षकांना स्वयंपाकघरातही वावरताना दिसणार आहे,’’ असे शशांकने आपल्या भूमिकेविषयी बोलताना सांगितले.
‘‘या मालिकेचे प्रोमो जाहीर झाल्यापासूनच प्रेक्षकांची उत्सूकता त्यांच्या विविध माध्यमांवरील प्रतिक्रियांतून माझ्यापर्यंत पोहोचली होती. आम्ही तुला दुपारच्या वेळी छोटय़ा पडद्यावर पाहातोय, हेही त्यांनी आवर्जून सांगितले. याला कारण अर्थातच मी आत्तापर्यंत प्रेक्षकांच्या मनामध्ये माझे स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरलो आहे, त्यामुळे त्यांनाही मी त्यांच्याच घरातला एक वाटतो. या सहज निर्माण झालेल्या नात्यातूनच ते त्यांच्या प्रतिक्रिया इतक्या हक्काने माझ्यापर्यंत पोहोचवत आहेत, याचा आनंद वाटतो,’’ अशी प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली. प्रेक्षक जेव्हा असे प्रेम एखाद्या कलाकारावर करतात तेव्हा साहजिकच अभिनेता म्हणून त्या कलाकाराची जबाबदारीही वाढत असते हेही तो प्रांजळपणे कबूल करतो.
मालिकेच्या रूपाने अनेक ज्येष्ठ मंडळी आणि नवोदित कलाकार एकत्रितपणे जोडले जातात. त्यामुळे हल्ली जवळपास अनेक मालिकांच्या सेटवर हे जुन्या-नव्या कलाकारांमधलं शीतयुद्ध पाहायला मिळतं आहे. शशांकला मात्र हे पटत नाही, एक अभिनेता म्हणून मालिकाविश्वातील नव्या आणि जुन्या पिढीची जुळवून घेतानाचा अनुभव आनंददायी वाटत असल्याचे त्याने सांगितले. तो म्हणतो, ‘‘खरं सांगायचं झालं तर सेटवर ४० ते ५० टक्के कलाकारांची उपस्थिती असलेली ‘मुरांबा’ ही पहिलीच मालिका आहे. त्यातून अनेक ज्येष्ठ मंडळी या मालिकेशी जोडली गेली आहेत ज्यात सुलेखा तळवळकर, प्रतिमा कुलकर्णी, स्मिता शेवाळे, अभिजीत चव्हाण हे सर्व जण आहेत. त्यामुळे नक्कीच मलाही त्यांच्याकडून खूप काही शिकता आले, आजमावता आले. अभिनयातील तो एक ठेहराव, दृश्यावर आपलं एक प्रभुत्व निर्माण करणे या सगळय़ाच गोष्टींचा त्यात समावेश आहे. त्यातून गंमत म्हणजे सेटवरच्या नवोदित आणि तरुण कलाकारांसोबत समाजमाध्यमावर कसे अजून छान प्रकट होता येईल? रील्स कसे बनवता येतील? अशा आत्ताच्या पिढीतल्या नावीन्यपूर्ण गोष्टीही शिकायला मिळत आहेत,’’ असे गमतीशीर उत्तरं देत दिग्दर्शक-लेखकापासून मालिकेची संपूर्ण टीम खूप भारी असल्याचे त्याने सांगितले.
दूरचित्रवाणीचा प्रभाव, त्याची ताकद ही आजही कायम आहे. ओटीटीचा भडिमार सोबत असताना मोठा प्रेक्षकवर्ग दूरचित्रवाणीपासून अजिबात दूर झालेला नाही. या माध्यमाने संवादशैलीलाही एक वेगळी उंची दिली आहे. ‘काहीही हं श्री’पासून अनेक उदाहरणे आहेत. हे सगळं लेखकांच्या जागरूकतेमुळे साध्य करणं शक्य झालं आहे, असे मत शशांकने मांडले. ‘‘प्रेक्षकांना कुठल्या पातळीपर्यंत काय बघायचे आहे आणि ऐकायचे आहे हे एक सुजाण लेखक-निर्माता उत्तमरीत्या हेरू शकतो. प्रेक्षक कुठपर्यंत काय स्वीकारत आहेत? याची जाणीव त्यांना बरोबर होते. दूरचित्रवाणीचा प्रेक्षक हा वय वर्ष दोन ते शंभर या सर्व वयोगटांतील आहे. त्यामुळे संवादातून ते कोणालाही अपमानास्पद वाटता कामा नये, कुटुंबीयांसोबत पाहाताना कुठे गैरसोयीचेही वाटू नये याची सर्वतोपरी काळजी संवादलेखक आणि लेखिकांना घ्यावीच लागते. शेवटी ती तारेवरची कसरत आहे. प्रेक्षकांना काय पटेल? आज मुलं घरी ज्या भाषेत बोलतात ती भाषा पालकांनी थोडय़ाफार प्रमाणात स्वीकारलेली आहे. तेव्हा हा बदल संवादशैलीतून छोटय़ा पडद्यावर आणू शकतो. पण.. मला नेहमीच असे अप्रूप वाटत राहिले आहे की, अशा लहानमोठय़ा मर्यादा असतानाही दूरचित्रवाणीने आपला प्रेक्षक आजतागायत सांभाळून ठेवला आहे. दूरचित्रवाणीला खरंतर रंगरूप, कपडे, भाषेच्या सगळय़ाच प्रकारच्या मर्यादा आहेत. हे सर्व सांभाळून लिहिणं ही फार मोठी तारेवरची कसरत आहे. या अशा अनेक गोष्टींमुळे मला प्रकर्षांने वाटते की दूरचित्रवाणीवर कलाकारांनी नक्कीच काम करायला हवे. ती जागरूकता इथे अनुभवायला मिळते, तसेच छोटा पडदा हा तुम्हाला जमिनीवर राहायला शिकवतो. हे सगळं मला या माध्यमातून गेले दहा वर्ष मिळत आलेले आहे. तेव्हा हे सगळे मी नाही सोडू शकत,’’ अशी आपली निर्मळ भावनाही त्याने व्यक्त केली.
मुरांबाचा प्रोमो आल्यानंतर समाजमाध्यमांवर मला अशाही काही प्रतिक्रिया आल्या की काय तू किती दिवस दूरचित्रवाणीवरच काम करणार? माझ्या मते याच क्षेत्रातील मोठे अभिनेते, दिग्गज कलाकार हे आता दूरचित्रवाणीच नाही तर त्यातूनही छोटय़ा अशा डिजिटल पडद्यावर प्रेक्षकांना दिसत आहेत. तेव्हा अशा वेळी मला असं वाटतं की प्रत्येक अभिनेत्याची त्याची अशी काही गणिते असतात, त्याचा एक स्वत:चा प्रेक्षक असतो. कारण शेवटी प्रेक्षकमान्यता नसेल तर कुठलाच अभिनेता टिकू शकत नाही. प्रत्येक कलाकार हा आपली एक स्वत:ची अशी जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो.
– शशांक केतकर, अभिनेता