भारताबाहेर राहणाऱ्या मराठीजनांना मराठी सिनेमांविषयी नेहमीच विशेष प्रेम राहिले आहे. त्या प्रेमातूनच निर्मिती, लेखन, अभिनय अशा माध्यमातून अनेक अनिवासि भारतीय मराठी सिनेमाशी जोडले जातात. ऑस्ट्रेलियास्थित गणेश लोके यांनी पुढाकार घेऊन दहशतवादावर आधारित ‘शूर आम्ही सरदार’ या सिनेमाची निर्मिती केली आहे. २१ एप्रिल रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
दहशवादाविरोधात एकत्र आलेले तीन तरुण नेमके काय करतात, त्यांना दहशवादाविरोधात काम करण्यात यश येते का? या आशयावर हा सिनेमा आधारित आहे. दहशतवादासारखा संवेदनशील विषय मराठी सिनेमात बऱ्याच काळाने हाताळण्यात येणार आहे. गणेश लोके यांनी या सिनेमात चौफेर जबाबदारी निभावली आहे.
त्यांनी या सिनेमाचे लेखन, प्रमुख भूमिका, सहदिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे. इंडो ऑस एण्टरटेनमेन्ट, झुमका फिल्म्स, सासा प्रॉडक्शनच्या डॉ. प्रज्ञा दुगल, श्वेता देशपांडे आणि गणेश लोके यांनी मिळून या सिनेमाची निर्मिती केली आहे. प्रकाश जाधव यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून, सिनेमात गणेश लोके यांच्यासह अभिनेते सयाजी शिंदे, भारत गणेशपुरे, संजय मोने, शंतनू मोघे असे अनुभवी कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
गणेश लोके गेली १७ वर्षं ऑस्ट्रेलियात वास्तव्याला आहेत. उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. २०१३ मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियन नागरिक म्हणून ऑस्ट्रेलियन फेडरल निवडणूकही लढवली होती. मराठी भाषा, मराठी सिनेमांवरील प्रेमापोटी त्यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. यापूर्वी त्यांनी अयुब खानची प्रमुख भूमिका असलेल्या सरफरोशी या हिंदी देशभक्तीपर सिनेमाचीही निर्मिती केली होती.
‘सिनेनिर्मिती हे माझे पॅशन आहे. सामाजिक संदेश असलेले, देशभक्ती जागृत करणारे सिनेमे करण्यात मला विशेष रस आहे. तरुणांनी समाजासाठी काहीतरी भरीव योगदान द्यावे यासाठी प्रोत्साहन देणे मला अधिक महत्त्वाचे वाटते,’ असं लोके यांनी सांगितले.