चाहते आपल्या लाडक्या क्रिकेटरसाठी काय काय करतील याचा काही नेम नाही. त्यातही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरची तर गोष्टच वेगळी. सचिनसाठी चाहते निरनिराळ्या मार्गाने त्यांच्याबद्दलचं आपलं प्रेम व्यक्त करतात. सचिनप्रती असणाऱ्या याच प्रेमापोटी एका चाहत्याने त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीने थेट चित्रपटाचीच निर्मिती केली आहे. सचिन जाधव असं त्या इरसाल चाहत्याचं नाव असून ‘तेंडल्या’ या मराठी चित्रपटाची निर्मिती त्याने केली आहे.

चाहत्यांच्या आयुष्यातील सचिनचं स्थान अधोरेखित करत चाहत्यांविषयी ‘तेंडल्या’मध्ये भाष्य केलं असल्याचं दिग्दर्शक सचिन जाधवने सांगितलं. ‘आमच्या चित्रपटातील पात्रे अज्याबात काल्पनिक नाहीत, लगेच हुडकाया जाऊ नका, कारण ते कुठं घावणार बी नाय…अख्या ऑल इंडियात जिवंत आसू द्यात की मेलेलं आसू द्या…त्याच्यासंग योगा योगान नव्हं… तर ओढून ताणून आणलं तरी बी संबंध जुळणार नाय,’ अशा विनोदी शैलीतील डिस्क्लेमर आणि आबालवृद्धांमध्ये खेळला जाणारा क्रिकेट आणि क्रिकेटवरील प्रेम अतिशय अफलातून पद्धतीने चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. या सर्व गोष्टींमुळे ‘तेंडल्या’बद्दल सिनेरसिक आणि क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

PHOTO: हार्दिक पांड्या आणि उर्वशी रौतेलामध्ये नेमकं काय शिजतंय?

चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन सचिन जाधवने केलं असून नचिकेत वाईकर हे सहदिग्दर्शक आहेत. क्रिकेट, तेंडूलकरप्रेम, आणि ग्रामीण भागातील सामान्यांचे जीवन अत्यंत वास्तवदर्शी पद्धतीने रेखाटणारा ‘तेंडल्या’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या टीझर आणि पोस्टरचे अनावरण जेष्ठ क्रीडा पत्रकार आणि समालोचक सुनंदन लेले यांच्या हस्ते मोठ्या दिमाखदार सोहळ्यात करण्यात आले.