नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारे ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक विक्रम चंद्रकांत गोखले (वय ७७) यांचे प्रदीर्घ आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. अभिनेते अजिंक्य देव यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्यांच्या निधनावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजिंक्य देव असं म्हणाले, “खरंच एक चांगला माणूस आणि एक महान कलाकार गेला, मराठी नाट्य, चित्रपटसृष्टी अशी दोन्ही माध्यमं त्यांनी गाजवली होती. त्यांच्या कामाचे नेहमीच कौतूक झाले आहे. मी त्यांच्याबरोबर तीन, चार चित्रपटात काम केलं होतं. इतका गुणी कलावंत, सगळ्यांना सांभाळून घेणारा माणूस, लहान मोठ्या कलाकारांना नेहमीच प्रोत्साहन देणे, नवोदित कलाकारांना मार्गदर्शन करणे. एखादा कलाकार अडखळत असेल तर त्यांनी कायमच त्याला मदत केली आहे. एका छान कलाकाराला आपण मुकलेलो आहोत. अमिताभ बच्चनसारख्या अभिनेत्यांबरोबर त्यांनी काम केलं आहे. आमचे आणि त्यांचे घरगुती संबंध होते. माझ्या आई वडिलांनी त्यांच्या वडिलांबरोबर काम केलं आहे. मला आता खूप विचित्र वाटत आहे, इतकी चांगली माणसं कुठे जातात? जेव्हा माझे बाबा गेले तेव्हा मला माहित होतं, आपल्याला सगळ्यांना एक दिवस जायचे आहे. मात्र तो दिवस जवळ आल्यावर खूप त्रास होतो.” अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

BREAKING: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

अजिंक्य देव अनेकवर्ष चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. विक्रम गोखले आणि अजिंक्य देव माहेरची साडी या सुपरहिट चित्रपटात एकत्र दिसले होते. या चित्रपटात विक्रम गोखले यांनी अजिंक्य देव यांच्या पित्याची भूमिका साकारली होती.

विक्रम गोखले हे गोखले घराण्याच्या अभिनय परंपरेतील चौथ्या पिढीचे प्रतिनिधी होते. त्यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री अभिनेत्या, तर आजी कमलाबाई गोखले (पूर्वाश्रमीच्या कमलाबाई कामत) या पहिल्या बाल-अभिनेत्री होत्या.ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले यांचा अभिनयाचा वारसा पुढे नेताना विक्रम गोखले यांनी पुढे सुरु ठेवला. विक्रम गोखले यांनी याच महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘गोदावरी’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती

विक्रम गोखले यांना अमिताभ बच्चन यांच्यामुळे मिळालं मुंबईत घर, स्वत:च सांगितलेला किस्सा

सीमेवर लढणाऱ्या जवानांना अर्थसाह्य करण्याबरोबरच रोखठोक भूमिका घेणारे पारदर्शी व्यक्तिमत्त्व असा सामाजिक भान जपणारा कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्यामागे पत्नी वृषाली आणि कन्या असा परिवार आहे. विक्रम गोखले यांचं पार्थिव आज दुपारी चार वाजता पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिर येथे अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. त्यानंतर सहाच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi news ajinkya dev commneted on veteran actor vikram gokhale death spg
First published on: 26-11-2022 at 15:39 IST