कविवर्य सुरेश भट लिखित
लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढय़ा जगात माय मानतो मराठी
ही कविता मराठीचे ‘अभिमान गीत’ म्हणून संगीतकार कौशल इनामदार यांनी पुढे आणली. मराठीतील मान्यवर गायक आणि दिग्गज मंडळींना बरोबर घेऊन तयार करण्यात आलेल्या या ‘अभिमान गीता’चे सूर गेल्या आठवडय़ात लंडन येथील अ‍ॅबेरोड स्टुडिओत घुमले.
अ‍ॅबेरोड स्टुडिओ येथे सादर झालेल्या मराठी अभिमान गीताविषयी लंडनहून ‘वृत्तान्त’शी बोलताना  कौशल  म्हणाला की, मराठीतील काही अभिजात कविता संगीतबद्ध करून त्या नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा तसेच या कवितांचे ध्वनिमुद्रण जगातील अत्याधुनिक स्टुडिओत आणि जगप्रसिद्ध वाद्यवृंदाबरोबर करण्याचा विचार आहे. या प्रकल्पाचा भाग म्हणून आपण येथे आलो आहोत. लंडन येथील माझे मित्र अ‍ॅड्रो मॅकी याने या स्टुडिओची भेट घडवून आणली. त्याने माझ्या प्रकल्पाबद्दल तसेच मी तयार केलेल्या मराठी अभिमान गीताबद्दल स्टुडिओच्या व्यवस्थापिका ल्युसी आणि मास्टरिंग इंजिनीअर अ‍ॅलेक्स व्हॉर्टन यांना सांगितले. अभिजात मराठी कवितांचे ध्वनिमुद्रण करून त्याचे जतन व संवर्धन करण्याची कल्पना त्यांनाही आवडली. या प्रकल्पात सहभागी होण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली. त्याच वेळी मी तयार केलेले मराठी अभिमान गीत ऐकवावे, अशी इच्छा त्यांनी प्रदर्शित केली. तेव्हा ‘यू टय़ूब’वरून आपण हे गीत त्यांना ऐकविले.
मराठीतील काही गेय आणि काही गेय नसलेल्या १५ कवितांची निवड आपण केली असून त्यात कुसुमाग्रजांच्या ‘पृथ्वीचे प्रेमगीत’, विंदा करंदीकरांच्या ‘पर्वतानो दूर व्हा रे’, कवी ग्रेस यांच्या ‘विराट घुमटातूनी’ आदी कवितांसह बालकवी, केशवसुत, इंदिरा संत, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ, आदींच्या कवितांचा समावेश आहे. मराठीतील मान्यवर आणि उदयोन्मुख गायकांकडून या सर्व कविता गाऊन घेण्याचा आपला प्रयत्न असणार असल्याचेही कौशलने सांगितले.