मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ऐतिहासिकपटांची लाट आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळय़ांची, सेनापतींची गोष्ट प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न प्रामुख्याने मराठी चित्रपटांतून केला जात आहे. स्वराज्यासाठी आपल्या प्राणांचीही पर्वा न करणाऱ्या मावळय़ांपैकी एक असलेला रावजी आणि त्याच्या प्रेमाची कथा ‘रावरंभा’ या ऐतिहासिक पटातून मोठय़ा पडद्यावर झळकली आहे. अनुप जगदाळे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अनेक आव्हानांचा सामना करत ‘रावरंभा’ ही गोष्ट प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केल्याचे अनुप जगदाळे यांनी सांगितले. ‘रावरंभा’ हा चित्रपट आजवर प्रदर्शित झालेल्या ऐतिहासिक पटांपेक्षा वेगळा असल्याचे ते सांगतात. आजवर सेनापतींचे खूप चित्रपट पाहिले आहेत. तानाजी मालुसरे, हंबीरराव मोहिते पाटील अशा सेनापतींची गोष्ट आपण पडद्यावर पाहिली आहे. मात्र रावजीसारख्या एका मावळय़ाची, त्याच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा वेध घेत ‘रावरंभा’ ही प्रेमकथा आणि शौर्यकथा पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा छत्रपतींवर आणि स्वराज्यावर असलेले प्रेम हे इतर कोणत्याही बाबींपेक्षा मावळय़ांसाठी सर्वश्रेष्ठ होते हे रावजीच्या प्रातिनिधिक कथेतून उलगडून सांगण्यात आले आहे.

‘ऐतिहासिक पट म्हणजे जोखमीचे काम’

मराठी चित्रपटाचे चित्रीकरण करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातही ऐतिहासिक पट म्हटला की मोठा सेट उभारावा लागतो. परंतु सध्या जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत सिमेंटचीच जंगले दिसतात. त्यामुळे अशा वेळी जर भव्य-दिव्य चित्रपट करायचा असेल तर जणू शिवधनुष्यच हाती घ्यावे लागते. ऐतिहासिक पट करणे म्हणजे फार जोखमीचे काम असल्याची कबुली यावेळी अनुप जगदाळे यांनी दिली. तो शिवकाळ उभा करण्याचे आर्थिक गणित फसले तर मोठे नुकसान होण्याची भीती असतेच, पडद्यावरही तो अचूक उभारण्याचे आव्हान दिग्दर्शकासमोर असते. शिवाय, ऐतिहासिक पट साकारताना कलाकारांची संख्या अधिक असते, या चित्रपटात शेकडो घोडे किंवा अन्य प्राणी देखील दाखवण्यात आले आहेत. प्राण्यांबरोबर चित्रीकरण करताना त्यांना अनुरूप वातावरण आहे का? किंवा चित्रीकरणासाठी ते तयार आहेत का? अशा अनेक बाबी विचारात घेत ऐतिहासिक पटासाठी चित्रीकरण करावे लागते, असे त्यांनी सांगितले. 

rajkaran gela Mishit marathi movie on April 19 in theaters
‘राजकारण गेलं मिशीत’ १९ एप्रिलला चित्रपटगृहात
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Raj Thackerey teaser
VIDEO : राज ठाकरे- अमित शाह यांच्या बैठकीत काय ठरलं? शिवतीर्थवरून मिळणार उत्तर, पाहा पाडवा मेळाव्याचा टीझर!
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’

गेल्या अनेक वर्षांपासून अनुत्तरित राहिलेला आणि वारंवार वर डोकं काढणारा प्रश्न म्हणजे मराठी चित्रपटांकडे मराठी प्रेक्षक पाठ का फिरवतात? किंवा मराठी चित्रपट महाराष्ट्रातच का चालत नाहीत? याबद्दल बोलताना इतर राज्यांमध्ये जसे त्यांच्या प्रादेशिक भाषेला प्राधान्य दिले जाते तसेच प्राधान्य जर का मराठी भाषेला चित्रपटांच्या स्वरूपात दिले तर अनेक प्रश्न मार्गी लागतील, असे जगदाळे यांनी सांगितले. महाराष्ट्रात केवळ बोलीभाषेतच मराठी भाषेचा पहिला क्रमांक लागतो; मनोरंजनाच्या बाबतीत मात्र इतर भाषांनंतर आपल्या भाषेतील मालिका-चित्रपटांचा विचार केला जातो याबद्दलही त्यांनी खंत व्यक्त केली. मराठी प्रेक्षकांनी मराठी चित्रपटाला पहिले प्राधान्य दिले तर कोणत्याच निर्मात्यांना हतबल व्हावे लागणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 शासनाने मदत करावी

मराठी प्रेक्षकांच्या अपेक्षेप्रमाणे चित्रपटांचे आशय-विषय नसल्याने मराठी प्रेक्षक चित्रपट पाहात नाहीत अशी ओरड ऐकू येते. यावर जगदाळे म्हणाले, ‘‘मराठी चित्रपटसृष्टीत १०० पैकी १० चित्रपटांचे आशय हे नक्कीच प्रेक्षकांच्या मनाला भिडणारे असतात. मात्र, सध्या प्रसिद्धीसाठी माध्यमांची वाढलेली संख्या आणि त्यासाठी करावा लागणारा खर्च पाहता अनेकदा निर्मात्यांना योग्य पद्धतीने चित्रपटाची पूर्व प्रसिद्धी करणे शक्य होत नाही’’. त्यामुळे राज्य शासनाने एक किंवा दोन अशी माध्यमे उभारली पाहिजेत जेणेकरून निर्मात्यांच्या खिशाला परवडेल अशा माध्यमांतून प्रेक्षकांपर्यंत चित्रपट पोहोचेल. अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचला तरच मराठी चित्रपट मोठा होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

असा साकारला ‘रावरंभा’ चित्रपट

‘रावरंभा’  या ऐतिहासिक चित्रपटाच्या उभारणीसाठी नेपथ्यावर अधिक लक्ष आणि खर्च केल्याचे जगदाळे यांनी सांगितले. महाराष्ट्रभरात वाई, महाबळेश्वर, पाचगणी व इतर अनेक ऐतिहासिक ठिकाणी प्रामुख्याने चित्रीकरण करण्यात आले आहे. मराठी चित्रपट म्हटला की निर्मितीखर्च आटोक्यात राहावा म्हणून अनेक बाबींमध्ये हात आखडता घेतला जातो. परंतु रावजी आणि रंभाची गोष्ट रंगवताना ती त्याच भव्य-दिव्य पद्धतीने मोठया पडद्यावर यावी हा मानस होता, त्यामुळे निर्मितीमूल्यात कसर ठेवलेली नाही, असेही जगदाळे यांनी सांगितले. आजच्या तरुण पिढीला भावेल आणि रुचेल अशा पद्धतीचे व्हीएफएक्सदेखील चित्रपटात वापरण्यात आल्याची माहिती जगदाळे यांनी दिली.