अमरावती येथील ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. रंगभूमीसाठी आयुष्य वेचणारे अशी त्यांची ओळख होती. राजाभाऊ मोरे यांनी आयुष्यभर ज्या रंगभूमीची सेवा केली, त्याच रंगभूमीसमोर राजाभाऊंनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

राजाभाऊ मोरे हे गुरुवारी (१५ डिसेंबर) संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात राज्य नाट्य स्पर्धेतील नाटक पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी ‘थँक यु मिस्टर ग्लाड’ हे नाटक सुरू होते. यावेळी नाटक पाहत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्राणज्योत मालवली. एका ज्येष्ठ रंगकर्मीने नाट्यगृहातच अखेरचा श्वास घेतल्याने अनेकांना धक्का बसला आहे.
आणखी वाचा : ‘केजीएफ’ फेम अभिनेत्याचे निधन, ‘रॉकी’बरोबर साकारलेली महत्त्वाची भूमिका

राजाभाऊ मोरे यांना नाट्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला होता. रंगभूमीला समर्पित केलेल्या जीवनाचा सन्मान म्हणून हा पुरस्कार त्यांना मिळाला होता. तत्कालीन नाट्य परिषद अध्यक्ष प्रभाकर पणशीकर यांच्या मार्गदर्शनात ३३ वर्षांपूर्वी राजाभाऊंनी अमरावती नाट्य परिषदेची स्थापना केली होती. सध्या या नाट्य परिषदेचे जवळपास ५०० सदस्य आहेत.

अमरावती शहरातच नव्हे तर ग्रामीण भागात सुद्धा राजाभाऊ यांनी नाट्य चळवळ सुरू केली आणि ती रुजवली. त्यांनी आझाद हिंद मंडळाच्या वतीने सतत ४० वर्ष स्पर्धामध्ये नाटक सादर केले. त्याबरोबरच १०० हून अधिक नाटकं त्यांनी दिग्दर्शित केली. त्यांना आजवर विविध पुरस्करांनी सन्मानित करण्यात आले आहे. नेपथ्य कलेतही ते अग्रेसर होते, शिवाय त्यांनी त्यांच्या हयातीत विविध नाट्यसंस्थांनाही मदत केली होती. राजाभाऊ सामाजिक, राजकीय, क्रीडा विभागातही सुद्धा सतत कार्यरत होते.

आणखी वाचा :‘आभाळमाया’ फेम अभिनेते पराग बेडेकर यांचं निधन, वयाच्या ४७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यांच्या निधनानंतर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ट्वीट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “अमरावती येथील ज्येष्ठ रंगकर्मी श्री राजाभाऊ मोरे यांच्या निधनाने हौशी रंगकर्मीचा आधारवड हरपल्याचे दुःख आहे. रंगदेवतेचा वास असलेल्या नाट्यगृहात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी दिग्दर्शक, नेपथ्यकार म्हणून दीर्घकाळ हौशी व प्रायोगिक रंगभूमीची सेवा केली. राज्य नाट्य स्पर्धा हा त्यांचा श्वास होता. दीर्घकाळ त्यांनी राज्य नाट्य स्पर्धा गाजविली. या निष्ठावान रंगकर्मीच्या निधनाने नाट्यक्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे”, असे ट्वीट त्यांनी केले आहे.