scorecardresearch

“मी महाराष्ट्राचा नागरिक म्हणून…” राजकीय धामधुमीत अवधूत गुप्तेचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र

गायक अवधूत गुप्ते याने याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिले आहे.

avdhoot gupte ekanth shinde
अवधूत गुप्ते एकनाथ शिंदे

“जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” हे गीत ऐकल्यानंतर आजही अंगावर रोमांच उभे राहतात. कविवर्य राजा बढे लिखित ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीतामधील दोन कडव्यांना महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारीपासून हे गीत अंगीकारण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकाराने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. नुकतंच गायक अवधूत गुप्ते याने याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिले आहे.

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक, संगीत दिग्दर्शक, दिग्दर्शक, निर्माता म्हणून अवधूत गुप्तेला ओळखले जाते. नुकतंच अवधूत गुप्तेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिलं आहे. त्या पत्रात त्याने “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या गीताला राज्यगीताचा दर्जा मिळाल्यानंतर कौतुक केले आहे.
आणखी वाचा : “तुम्ही नसताना…” ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ला राज्यगीताचा दर्जा मिळाल्यानंतर शाहीर साबळेंच्या नातवाची ‘ती’ पोस्ट चर्चेत

अवधूत गुप्तेचे पत्र

प्रति
माननीय मुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्य

“जय जय महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीत म्हणून स्वीकारण्याच्या निर्णयाचे मी महाराष्ट्राचा नागरिक म्हणून प्रचंड कौतुक आणि स्वागत करतो !

महाराष्ट्राच्या भौगोलिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक समृद्धीचा सार्थ अभिमान या गाण्याच्या शब्दा शब्दात ठासून भरला आहे. तो अभिमान केवळ मराठी माणसापुरताच मर्यादित न ठेवता संपूर्ण देशाला, किंबहुना जगाला सुद्धा ऐकू जाईल इतक्या आवाजात, विविध प्रकारे, विविध ठिकाणी, विविध मार्गाने आणि विविध भाषांमधून दवंडी पिटून सांगायला हवा.

आता राज्यगीताचा सन्मान राखणं हे बंधनकारक होईल हे स्वागतार्ह परंतु. सादरीकरणाऱ्या नियमावलीमुळे या गीताचा जगभर पसरत असलेला परिमळ उलट प्रतिबंधीत होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.

काही वर्षांपूर्वी पुरोगामी विचारांनी भारताचा झेंडा फडकवण्याचे नियम शिथिल केल्याने ज्या प्रकारे आता गल्लीबोळात, नाक्या नाक्यावर तिरंगा डौलात फडकवताना दिसतो. त्याचप्रकारे आता हे नवीन महाराष्ट्र राज्यगीत महाराष्ट्राच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये सतत ऐकू येवो हीच आई एकविरेचरणी प्रार्थना!

जय जय महाराष्ट्र!!”

आपला
अवधूत गुप्ते

आणखी वाचा : अवधूत गुप्ते लवकरच करणार राजकारणात प्रवेश, घोषणा करत म्हणाला “माझा हेतू…”

दरम्यान अवधूत गुप्ते हा लवकरच राजकीय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने याबद्दल घोषणा केली आहे. अवधूत गुप्ते हा फक्त पाच वर्षासाठी राजकारणात येणार असला तरी तो कधी राजकारणात येणार याबद्दल त्याने काहीही सांगितलेले नाही. त्याबरोबरच अवधूत गुप्ते कोणत्या राजकीय पक्षात प्रवेश घेणार, याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 13:43 IST
ताज्या बातम्या