Marathi Singer Shares Emotional Video : नुकताच भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा झाला. यानिमित्त अनेक कलाकारांनी आपल्या चाहत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. अशातच एका मराठी गायिकेला स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताची आठवण आली असून याबद्दलचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला, ही गायिका म्हणजे शाल्मली खोलगडे.
शाल्मलीने स्वातंत्र्यदिनानिमित्त सोशल मीडियावर भावुक व्हिडीओ शेअर केला आणि या व्हिडीओद्वारे तिने मला माझ्या मातृभूमीची, भारत देशाची आठवण येत असल्याची भावना व्यक्त केली. तसंच या आठवणीत तिने चाहत्यांसाठी एक गाणंही सादर केलं.
या व्हिडीओमध्ये शाल्मली म्हणते, “मी भारतात नसल्यामुळे मला भारताची खूप आठवण येतेय आणि यानिमित्ताने मला आठवतंय की लहानपणी मी, माझी आई, बाबा आणि मोठा भाऊ मिळून एक गाणं गायचो. ते गाणं म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जयोस्तुते…” यानंतर शाल्मली व्हिडीओमध्ये, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘जयोस्तुते’ गाण्याचं तिच्या आवडीचं एक कडवं गाते.
शाल्मली स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘जयोस्तुते’ या गाण्यामधील ‘गालावरच्या कुसुमीं किंवा कुसुमांच्या गालीं स्वतंत्रते भगवती । तूंच जी विलसतसे लाली तूं सूर्याचें तेज, उदधिचें गांभीर्यहि तूंची स्वतंत्रते भगवती । अन्यथा ग्रहण नष्ट तेंची वंदे त्वामहं यशोयुतां वंदे’ या ओळी गाते.
शाल्मलीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून अनेक कलाकार आणि चाहत्यांनी या व्हिडीओला लाईक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. “तुझा आवाज ऐकून तृप्त झालो”, “तुला मराठी गाणं गाताना पाहून खूप छान वाटलं”, “किती गोड!” या आणि अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी या व्हिडीओवर व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, ‘इश्कजादे’ या चित्रपटातील ‘परेशान’ या गाण्यानं शाल्मली प्रसिद्धी झोतात आली. त्यानंतर शाल्मलीने बॉलीवूडमधील अनेक हिट गाण्यांना आपला आवाज दिला आहे. भावस्पर्शी गाणी असो किंवा जोशपूर्ण पॉप स्टाईलची गाणी असो… या दोन्ही शैलीची गाणी गाण्यात शाल्मलीचा हातखंड आहे.
‘ये जवानी है दिवानी’मधील ‘बलम पिचकारी’, ‘सुलतान’मधील ‘बेबी को बेस पसंद है’ आणि ‘अय्या’ चित्रपटातील ‘अगं बाई’सारखी तिची अनेक लोकप्रिय गाणी आजही चाहत्यांच्या स्मरणात आहेत. फक्त हिंदी चित्रपटसृष्टीतच नव्हे, तर शाल्मलीने अनेक प्रादेशिक भाषांमधील गाण्यांमधून आपल्या आवाजाची जादू निर्माण केली आहे. शिवाय तिने गाण्यांच्या कार्यक्रमांचं परीक्षणही केलं आहे.