भारतीयांना पाश्चात्त्यांबद्दल जितके आकर्षण वाटते, तितकीच उत्सुकता त्यांनाही भारतीय संस्कृतीबद्दल आहे. आणि हीच उत्सुकता मनात बाळगून अभिनेत्री मारिया एग्रोपोलिस भारतात आली आहे. ती सध्या उत्तर प्रदेशात आहे.
पाश्चात्त्य देशांतून भारतात येणारे बहुतांशी कलाकार येथील उत्तमोत्तम सोयींचा अनुभव घेतात, भारतीय कलाकारांच्या पाटर्य़ाना भेटी देतात. येथील ऐतिहासिक स्थळांची स्तुती करतात. परंतु समाजसेवेची आवड असलेल्या मारियाने यातले काहीही न करता थेट येथील शाळा व कॉलेजना भेटी दिल्या. विद्यार्थ्यांशी मनसोक्त गप्पा मारल्या. उत्तर प्रदेशातील सर्वसामान्य स्त्रियांशी संपर्क साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तिने एक कुटुंबदेखील दत्तक घेतले आहे. आणि त्या घरातील मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च ती उचलणार आहे.
आजवर ‘हंट टू किल’, ‘वॉकिंग द हॉल्स’, ‘द रिमार्केबल लाइफ’, ‘द नंब’ यांसारख्या अनेक हॉलीवूडपटांमध्ये झळकलेल्या मारियाला लहानपणापासूनच समाजसेवेची आवड आहे. ती कुपोषित मुलांसाठी कार्य करणाऱ्या ‘फूड फॉर लाइफ’ या स्वयंसेवी संस्थेची कार्यकारी सदस्य आहे. ही संस्था जगभरातील लहान मुलांच्या आहाराबाबतच्या समस्या लक्षात घेऊन त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करते. आणि याच संस्थेच्या अंतर्गत तिने हा भारत दौरा केला आहे. मारियाने भारतात झालेला विकास, येथील समाजजीवन, धार्मिक अस्मिता आणि खाद्यसंस्कृती यांची तोंडभरून स्तुती करणारे फोटो व व्हिडीओ समाजमाध्यमांवर अपलोड केले आहेत. तसेच ती भगवान श्रीकृष्ण यांच्या तत्त्वज्ञानानेही फार प्रभावित झाली आहे. परंतु त्याचबरोबर तिने उत्तर प्रदेशातील शैक्षणिक समस्या, स्त्रियांचे होणारे शोषण, वाढत जाणारे कुपोषण याबाबत आपली नाराजी व्यक्त केली. तसेच येथील मुलांना शक्य तेवढी मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासनदेखील दिले.