नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून पट्टीचा अभिनय सादर करत अभिनेता सुबोध भावेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. काही दिवसांपूर्वीच या अभिनेत्याने ‘घेई छंद’ या पुस्तकातून चित्रपटसृष्टीतील त्याच्या प्रवासाचा आढावा त्याच्याच शब्दांत मांडला. अभिनेता ते एक लेखक म्हणून त्याचा प्रवास तसं पाहिलं तर बराच रंजक आहे. एक अभिनेता म्हणून तो जितका संपन्न आहे तितकाच एक वाचक म्हणूनही समृद्ध आहे. समृद्ध वाचक असणाऱ्या या अभिनेत्याचा किताबखानाही तितकाच मोठा असून, त्यात काही रहस्यकथा दडलेल्या आहेत. चला तर मग डोकावूया सुबोध भावेच्या किताबखान्यात.
शंकर पाटील, महेश एलकुंचवर, अभिराम भडकमकर, श्री. ना. पेंडसे, गदिमा, व्यकंटेश माडगूळकर या लेखकांच्या पुस्तकांनी सुबोधचा किताबखाना समृद्ध झाला आहे. यासोबतच भारतीय इतिहास पुनरुज्जीवित करणारी काही पुस्तकंसुद्धा त्याच्या किताबखान्यात आहेत. याविषयी सुबोध म्हणाला, ‘मी रहस्यकथांमध्ये जास्त रमतो. किंबहुना चांगल्या रहस्यकथांच्या मी सतत शोधात असतो. कोणत्याही गोष्टीबद्दल ठाम अंदाज वर्तवता न येणाऱ्या कथांमध्ये मी जास्त रमतो. अशाच पुस्तकांपैकी माझ्या वाचनात आलेलं एक पुस्तक म्हणजे पानिपत. विश्वास पाटीस या सिद्धहस्त लेखकाच्या लेखणीतून उतरलेलं हे पुस्तक मी अजूनही पूर्ण वाचलं नाहीये. पण, तरीही ते पुस्तक मला भावलं आहे. पानिपतच्या युद्धावर भाष्य करणाऱ्या या पुस्तकामध्ये हा विषय इतक्या सुरेख शब्दांत मांडण्यात आला आहे की त्यातून शब्दांची ताकद जाणवते. या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला असला तरीही ती एक शौर्यगाथा आहे, हे विसरुन चालणार नाही. त्यामुळे ही शौर्यगाथा वाचताना एक प्रकारची अस्वस्थता जाणवते.. असं आहे हे पानिपत.’
रहस्यकथांच्या वाचनात रमणारा सुबोध ज्यावेळी स्वत:चं पुस्तक लिहिणार हे कळलं तेव्हा अनेकांनीच त्याच्या पुस्तकाविषयी जाणून घेण्यासाठी कुतूहल व्यक्त केलं होतं. त्याच्या या पुस्तकांच्या चाहत्यांमध्ये अशीच एक वाचक म्हणजे अमृता खानविलकर. पुस्तक लिहिण्याच्या या अनुभवाविषयी सांगताना सुबोध म्हणाला, ‘मी काही मोठ्या लेखकांमध्ये वर्णी लागण्यासाठी हे पुस्तक लिहिलं नाही. पण, फक्त माझा हा प्रवास शब्दांमध्ये मांडला जावा हा एक छोटासा प्रयत्न होता. या पुस्तकाविषयीचे इतरांचे अभिप्राय माझ्यापर्यंत पोहोचतात तेच माझं यश आहे.’ अशा या लेखनाच्या सवयीविषयी सांगताना किंडल आणि खऱ्याखुऱ्या पुस्तकाविषयीही सुबोधने त्याचं मत मांडलं. पुस्तकाच्या पानाला हात लावल्याशिवाय ते वाचल्याचं सुख मिळतच नाही. राहिली गोष्ट हल्लीच्या पिढीला पुस्तक वाचण्याविषयीचा संदेश देण्याची तर, मी काही सल्ला देण्याइतका मोठा नाही. पण, एकच सांगणं आहे… पुस्तकं वाचा.
शब्दांकन- सायली पाटील
sayali.patil@indianexpress.com
Father’s Day 2017 : बाबाच सांगत आहेत ‘आर्ची’च्या धाडसाची कहाणी
