गोनीदांच्या त्या लघुकथेचं मी इंग्रजीत भाषांतरही केलं आहे. असं जेव्हा ती म्हणाली तेव्ही थोडं आश्चर्यंच वाटलं. एक अभिनेत्री आणि सतार वादक म्हणून ओळखली जाणारी नेहा जेव्हा तिच्या वाचनाच्या सवयीबद्दल आणि किताबखान्याबद्दल संवाद साधत होती तेव्हा तिचा आनंद शब्दांतून व्यक्त होत होता. आपल्या वाचनात आलेली पुस्तकं आणि किताबखान्यामध्ये असलेली विविधता इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठीची तिची तगमग आणि वाचनाप्रती असलेली तिची ओढ प्रकर्षाने जाणवते.
मराठी चित्रपटसृष्टीत सध्याच्या घडीला काही तरुण कलाकार मंडळींनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या कलाकारांमधील एक नाव म्हणजे नेहा महाजन. चौकटीतील अभिनयाला शह देत नेहाने चित्रपटसृष्टीत स्वत:चा असा प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. अशी ही अभिनेत्री एक वाचक म्हणूनही तितकीच समर्पित आहे. आपल्या किताबखान्याविषयी सांगताना नेही म्हणाली, माझ्या किताबखान्यात बऱ्याच प्रकराची पुस्तकं आहेत.
बऱ्याच पुस्तकांच्या या नोटवर सुरु झालेल्या या किताबखान्याच्या सफरीत पहिलं स्थानक आलं ते म्हणजे मुळच्या कन्नड पुस्तकाच्या रुपात.
‘घच्चर घोच्चर’ या पुस्तकाची अनुवादित आवृती मी नुकतीच वाचली असून ते मला फारच आवडलं आहे. त्यातील लेखनशैली मला जास्त भावली, असं नेहा म्हणाली. या अनुवादित पुस्तकासोबतच तिने ‘द अॅगनी अॅण्ड द एक्स्टसी’ या पुस्तकाचासुद्धा उल्लेख केला. एक कलाकार म्हणून या पुस्तकातून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्यातही कलाकाराच्या आयुष्यावरील पुस्तक नेहमीच प्रेरणादायी असतात, असं म्हणत या पुस्तकाविषयीची ओढ तिने व्यक्त केली. तुझा आवडता लेखक कोण, असा प्रश्न विचारला असता काही सेलिब्रिटींप्रमाणे तीसुद्धा बुचकळ्यात पडली. आवडता एक लेखक सांगणं तसं कठीण आहे, असं म्हणत सरतेशेवटी तिने एक नाव पुढे केलं.
जॉर्ज लुईल बोर्हेस Jorge Luis Borges हा माझा आवडता लेखक आहे. ज्याच्या लेखणीतील एखादं पान वाचूनही मला फार दिलासा मिळतो, असं म्हणत, ‘सध्याच्या घडीला ‘सितार अॅण्ड सरोद इन १८ सेन्चुरी’ Sitar and Sarod in the 18th and 19th Centuries हे पुस्तक वाचण्याची इच्छा असल्याचं नेहा म्हणाली. एलन मायनर Allyn Miner यांनी लिहिलेल्या या पुस्तकामध्ये बरीच माहिती देण्यात आली आहे’, असं म्हणत संगीताविषयी ओढ असणाऱ्या नेहाने वाचनाविषयीही असलेली तिची आत्मियता यावेळी व्यक्त केली. गो. नी. दांडेकर, व्यंकटेश माडगूळकर, जी. ए. कुलकर्णी, अरुंधती रॉय या लेखकांच्या वाचनाने प्रभावित झालेल्या नेहाने सध्याच्या पिढीच्या वाचनाच्या सवयीविषयीसुद्धा तिचं मत मांडलं.
वाचा : ‘कोणत्याही मुलीला किस केल्यास मी तुझे ओठ चिरेन’
‘हल्लीच्या दिवसांमध्ये लेखकांचं आणि पुस्तकांचं जाहिरातीकरण फार वाढलं आहे. ज्याची उदाहरणं आपल्या समोर आहेत. त्यामुळे सध्याचे लेखक आणि काही दिग्गज लेखक यांची तुलना होणं शक्यच नाही. वाचनही संगीतसाधनेप्रमाणेच आहे. त्याची सवय व्हावी लागते. संगीतकलेमध्ये ज्याप्रमाणे रियाजाला महत्त्व असतं त्याचप्रमाणे वाचनामध्येही ती सवय अंगी बाणवण्यासाठी थोडा वेळ देणं गरजेचं असतं’, असंही नेहा म्हणाली. किताबखान्याविषयी बोलणाऱ्या नेहाचा आनंद आणि आवडत्या पुस्तकांविषयीची माहिती सांगण्यासाठीचा उत्साह आवाजातून व्यक्त होत होता.
यापुढील सेलिब्रिटी वाचकाच्या आवडत्या पुस्तांविषयी जाणून घेण्यासाठी वाचत राहा ‘माझा किताबखाना’.
शब्दांकन- सायली पाटील
sayali.patil@indianexpress.com