मेरी प्यारी बिंदू सिनेमा आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. पण आयुषमान आणि परिणीती या सिनेमाचे शेवटच्या क्षणापर्यंत प्रमोशन करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. सध्या आयुषमान आणि परिणीती ट्विटरवर त्यांचे नवनवीन गाण्यांचे व्हिडिओज पोस्ट करून एकमेकांना टॅग करत आव्हान देत आहेत.

आयुषमानने परिणीतीला त्याच्या ट्विटमध्ये टॅग करत एक प्रश्न विचारला, ‘बिंदू तू फक्त नावाचीच बिंदू आहेस की, तुला मुळ बिंदूप्रमाणे डान्सही करता येतो?’ आयुषमानच्या या ट्विटवर मग परिणीती आणि त्याचे संभाषणच सुरू झाले. त्यांनी ‘चढती जवानी’, ‘डिस्को डान्सर’, ‘हंगामा हो गया’ अशा जुन्या हिट गाण्यांवर थिरकतानाचे व्हिडिओ शेअर केले.

बिंदू अर्थात परिणीतीने जुन्या गाण्यांचा आनंद घेत डान्स केला. पण, आयुषमानची बातच काही वेगळी. आयुषमानने तर अक्षरशः मूळ गाणेच सादर केले असे वाटले. आयुषमान आणि परिणीतीचा हा जलवा  ‘मेरी प्यारी बिंदू’मध्ये असाच दिसेल का हा खरा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तरही याच आठवड्यात मिळेल.

एसएस राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली’ सिनेमाच्या प्रदर्शनानंतर हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे बाहुबलीची दोन आठवड्यांची घौडदौड हा सिनेमा थांबवेल का? हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे. अक्षय रॉय दिग्दर्शित ‘मेरी प्यारी बिंदू’ हा सिनेमा १२ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. परिणीतीने या सिनेमात सोनू निगमसोबत माना के ‘हम यार नहीं’ हे गाणेही गायले आहे.