स्वत:ला प्रकाशझोतात ठेवण्यासाठी अभिनेते आणि अभिनेत्री कधी काय करतील सांगता येत नाही. आपल्या ‘फिटनेस गोल्स’मुळे नेहमीच चर्चेत असलेला अभिनेता मिलिंद सोमण याने नुकतेच एक फोटो पोस्ट करत नेटीझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे. वयाच्या पन्नाशीनंतरही तरुणींच्या मनाचा ठाव घेणाऱ्या मिलिंदने आपले ९० च्या दशकातले तरुणपणीचे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.
हा फोटो जवळपास ३० वर्षांपूर्वीचा असून त्यावेळी मिलिंद २४ वर्षांचा होता. ४ नोव्हेंबर रोजी मिलिंद आपल्या वयाची ५४ वर्षे पूर्ण करणार असून आजही तो महिला आणि मुलींच्या गळ्यातील ताईत आहे. त्याच्या तरुण वयात त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी तर त्याचा हा फोटो म्हणजे एक पर्वणीच आहे.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, “१९९०…जेव्हा मी दाढी करायचो, सूट आणि बूट घालायचो. वयाच्या २४ वर्षांतील हा फोटो.” त्याच्या या कोवळ्या वयातील फोटोला इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आल्या असून अवघ्या तासाभरात या फोटोला २० हजारांहून जास्त लाइक्स आले आहेत. माझा तरुणपणीचा क्रश,आता कितीवेळा हृदयाचा ठाव घेणार, मेड इन इंडिया यांसारख्या एकाहून एक प्रतिक्रिया नेटीझन्सचे लक्ष वेधून घेत आहेत. काहींनी त्याच्या या फोटोवर आपल्या आवडीचे गाणेही प्रतिक्रिया म्हणून पोस्ट केले आहे तर काहींनी या फोटोची गमतीत खिल्ली उडवल्याचेही पाहायला मिळत आहे.