सध्या टेलव्हिजन मालिकांच्या विश्वात झी युवा ही वाहिनी युवा प्रेक्षकांच्या मनात चांगलेच घर करुन राहिली आहे. या वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या विविध धाटणीच्या मालिकांनी अनेक नव्या दमाच्या कलाकारांना एक नवी ओळख दिली आहे. झी युवावरील अशाच एका मालिकेतील प्रसिद्ध चेहरा म्हणजे युवा अभिनेत्री मिताली मयेकरचा. ‘फ्रेशर्स’ या मालिकेतील ‘सायली’ ही भूमिका साकारणाऱ्या मिताली मयेकर हिने तिच्या भूमिकेद्वारे आजच्या युथवर एक प्रकारची मोहिनीच घातली आहे. आजची तरुणाई सायलीच्या प्रेमात आहे. आपली प्रियसीही सायली सारखीच सुंदर, हुशार आणि बिनधास्त असावी. तिच्याबरोबर आपल्याला बऱ्याच गोष्टी शेअर करता आल्या पाहिजेत अशा काहीशा कल्पनांमध्ये आजची तरुणाई स्वप्न बघत आहे. तिच्या चाहत्यांची संख्यासुद्धा दिवसें दिवस वाढत आहे. झी युवावरील ‘फ्रेशर्स’ या नव्या मालिकेमुळे तिने अनेक चाहते कमावले.
बेधडक आणि बिंधास ‘फ्रेशर्स’ फेम मिताली मयेकर हिने कमी वेळातच तिच्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. मिताली ही मालिका आणि चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीस अली पण आता ठाणेकरांना मिताली एका वेगळ्या माध्यमातून भेटणार आहे. बाळकूम ठाणे येथे १९ मार्चला होणाऱ्या पिंकथॉनचा मिताली हिस्सा असणार आहे. महिलांचे सशक्तीकरण हा उद्देश असलेले पिंकथॉन आता ठाण्यात देखील आयोजित करण्यात आले आहे आणि त्यामध्ये मिलिंद सोमण व सोनाली कुलकर्णी या दिग्गजांसोबत मिताली ही आजच्या युथचे प्रतिनिधित्व करणार आहे. पिंकथॉनसाठी उत्सुक असलेल्या मितालीने मिलिंद सोमण आणि सोनाली कुलकर्णी सोबतचे फोटोज सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. या पिंकथॉनमध्ये ठाणेकरांनी उत्तम प्रतिसाद द्यावा असे आवाहन देखील मितालीने केले.
मिताली मयेकर हे नाव आता मराठी मालिका आणि चित्रपट विश्वामध्ये चांगलेच स्थिरावत आहे. ‘उर्फी’ या चित्रपटामध्येही मितालीने साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. विविध मालिका, चित्रपट आणि आता पिंकथॉनच्या निमित्ताने मिताली शक्य त्या सर्व परिंनी या क्षेत्रामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहे असेच म्हणावे लागेल.