रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्र‌वाणी मालिका अशा तीनही माध्यमांतून आपल्या अभिनय कर्तृत्वाचा ठसा उमटवून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक विक्रम चंद्रकांत गोखले (वय ७७) यांचे प्रदीर्घ आजाराने पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. सीमेवर लढणाऱ्या जवानांना अर्थसाह्य करण्याबरोबरच रोखठोक भूमिका घेणारे पारदर्शी व्यक्तिमत्त्व असं सामाजिक भान जपणारा कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे.

गेले काही दिवस विक्रम गोखले यांची प्रकृती नाजूक होती आणि पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. कालच ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत हे वृत्तदेखील समोर आलं होतं. पण आज सकाळी त्यांच्या प्रकृती आणखी ढासळली. दुपारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली. नुकतंच विक्रम गोखले यांनी जितेंद्र जोशीच्या ‘गोदावरी’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती.

विक्रम गोखले यांच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीने हळहळ व्यक्त केली आहे. याबरोबरच राजकीय नेत्यांनीही त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. नुकतंच ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट करत विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राज ठाकरे यांनी विक्रम गोखले यांचा फोटो शेअर करत त्यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

या पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणतात, “मुळात रंगमंच, सिनेमा आणि टेलिव्हिजन या तिन्ही माध्यमांमध्ये सराईतपणे अभिनय करू शकणारे अभिनेते दुर्मिळच. त्यात अनेकदा असं जाणवत आलंय की अनेक अभिनेते तिन्ही माध्यमात उत्तम अभिनय करत असले तरी त्यांचा सर्वोत्कृष्ट अभिनय कुठल्यातरी एका प्रकारात खुलतो. पण विक्रम गोखले हे त्याला दुर्मिळ अपवाद होते. तिन्ही माध्यमांवर एकसारखी हुकूमत हे कमालच. त्यांची संवादफेक उत्तम होतीच, पण चेहऱ्यावरचे हावभाव आणि डोळ्यातूनदेखील बोलण्याची त्यांची हातोटी कमाल होती. तीन पिढ्यांचा अभिनयाचा वारसा घेऊन आणि तो ही उत्तम अभिनयाचा वारसा घेऊन ह्या क्षेत्रात उतरायचं आणि स्वतःला सिद्ध करायचं हे कठीण असतं, पण विक्रम गोखलेंना ते सहज पेललं. मला अजून एका बाबतीत विक्रम गोखले आवडायचे. ते म्हणजे राजकीय भूमिका घेताना कचरत नसत आणि ते कमालीचे धर्माभिमानी होते. त्यांच्या सर्वच भूमिका काही मला मान्य होत्या असं नाही, पण किमान ते भूमिका घ्यायचे हे विसरता येणार नाही. भूमिका घेताना अभिनय न करणारा आणि अभिनय करताना भूमिका जगणारा कलावंत आज आपल्यातून निघून गेला. विक्रम गोखलेंच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अभिवादन.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विक्रम गोखले हे गोखले घराण्याच्या अभिनय परंपरेतील चौथ्या पिढीचे प्रतिनिधी होते. त्यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री अभिनेत्या, तर आजी कमलाबाई गोखले (पूर्वाश्रमीच्या कमलाबाई कामत) या पहिल्या बाल-अभिनेत्री होत्या. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या १९१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मोहिनी भस्मासूर’ चित्रपटात दुर्गाबाई यांनी पार्वतीची आणि कमलाबाईंनी मोहिनीची भूमिका केली होती. ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले यांचा अभिनयाचा वारसा पुढे नेताना विक्रम गोखले यांनी सीमेवरील जवानांसाठी अर्थसाह्य करण्याची परंपरादेखील जीवनाच्या अखेरपर्यंत चालू ठेवली होती.